सांगली : राज्यभरात गणरायाचं उत्साहात आगमन झालं आहे. ठिकठिकाणी गणराय आता मंडळामध्ये विराजमान झाले आहे. पण, दुसरीकडे सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानमध्ये यंदा गणेशोत्सवाच्या सुरुवातीला एक मोठा वाद उफाळून आला आहे.
श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या कन्या आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन-दासानी यांनी तब्बल चार वर्षांनंतर सांगलीत येऊन गणरायाची आरती केली. त्यामुळे आता सांगली संस्थानाच्या उत्तराधिकारी पदावरून पटवर्धन कुटुंबातील वाद उफळला आहे.
सांगली गणपती पंचायतन संस्थानाच्या उत्तराधिकारी पदावरून पटवर्धन कुटुंबातील वाद उफळण्याची शक्यता आहे. अभिनेत्री राजकन्या भाग्यश्री यांनी नूतन युवराज आदित्यराजे यांना डावलत गणपती मंदिरात आरती केल्याने वादाला सुरुवात झाली. यावेळी मी वारसदार असल्याचा दावा करत अभिनेत्री भाग्यश्री यांनी थेट गाभाऱ्यात जाऊन उत्सव मूर्तीची आरती केली. यामुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली.
भाग्यश्री यांनी केली आरती, मंदिरात झाली बाचाबाची
भाग्यश्री पटवर्धन यांनी सकाळीच मुख्य गणपती मंदिर गाठत मंदिराच्या गाभाऱ्यात ठिय्या मारला. यावेळी प्रतिष्ठापना करण्यासाठी उत्सव मूर्ती दरबार हॉलकडे जाण्यासाठी आरती करण्यात येणार होती. यासाठी विद्यमान युवराज आदित्य राजे पटवर्धन यांना बोलवण्यात आलं, मात्र त्यांना थांबवण्यात आलं. तर दुसरीकडे भाग्यश्री यांनी थेट गाभाऱ्यात प्रवेश केला आणि आरती केली. यावेळी मंदिराचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर आणि भाग्यश्री यांच्यामध्ये शाब्दिक वादही झाला. भाग्यश्री यांना आरतीपासून रोखण्याचा प्रयत्नही झाला. पण, भाग्यश्री यांनी आरती करूनच बाहेर पडल्या. या प्रकारमुळे सर्वजण अचंबित झाले. संस्थांनाच्या गणपती मूर्तीची आरती करण्याचा अधिकार मला आहे, त्यामुळे मी आरती केल्याचा दावा अभिनेत्री आणि राजकन्या भाग्यश्री यांनी केला आहे.
भाग्यश्रींच्या कृत्याने राजेसाहेब संतापले
दरम्यान, या घटनेमुळे राजेसाहेब विजयसिंह पटवर्धन चांगलेच संतप्त झाले. मी राजा या नात्याने आदित्य पटवर्धन यांना राजकुमार म्हणून जाहीर केलं आहे. त्यामुळे यापुढे आदित्य राजेच संस्थांनाचे पुढचे राजे असणार आहेत. युवराजांना थांबवून भाग्यश्री यांनी आरती करणे आणि लोकांना घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यात घुसणे हे काही योग्य नाही, असं म्हणत राजेसाहेब पटवर्धन यांनी नाराजी व्यक्त केली.
भाग्यश्री आणि हिमालयन यांच्याशी व्यवहार करू नका- राजेसाहेब
तसंच, भाग्यश्री यांना असं करण्याचा अधिकार नाही, त्यामुळे भाग्यश्री आणि पती हिमालयन यांच्याशी संस्थानांच्या मालमत्तेबाबत कोणीही व्यवहार करू नका, असं आवाहनच आता राजे साहेबांनी केलं आहे. आणि आदित्य राजे पटवर्धन हेच संस्थांनाचे उत्तराधिकारी असतील आणि सांगलीकर जनतेने त्यांना साथ द्यावी, असं आवाहनही विजयसिंह राजे पटवर्धन यांनी केलंय.
भाग्यश्री पटवर्धन यांचं काय म्हणणंय?
दरम्यान, मंदिरात घडलेल्या प्रकारावर अभिनेत्री भाग्यश्री यांनी आपली भूमिका मांडली. श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांची प्रकृती सध्या ठीक नाही. गणेशोत्सवाची ही प्राचीन परंपरा खंडित झाली नाही पाहिजे, त्यामुळे ३ मुलींपैकी एकाने उपस्थित राहणे गरजेचं होतं. म्हणून मी तिथे आरतीसाठी हजर होते, असं भाग्यश्री यांनी स्पष्ट सांगितलं. पण, आता विजयसिंहराजे यांनी अधिकृत उत्तराधिकारी म्हणून नेमणूक केलेले युवराज आदित्यराजे पटवर्धन मंदिरात आले होते, त्यांना विरोध करून आरती का केली, यावर मात्र, भाग्यश्री यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.विद्यमान युवराज आणि उत्तराधिकारी असताना भाग्यश्री यांनी आरती केल्यामुळे गणेशोत्सवाच्या काळामध्ये पटवर्धन घराण्यातला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पटवर्धन घराण्यातला वाद हा सांगलीमध्ये आता चर्चेचा विषय बनला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.