🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जयंती २ : आदिवासी विद्यार्थिनीच्या अन्यायाविरुद्ध आवाज आणि संविधानिक मूल्यांची जाणीव करून देणारा चित्रपटअनिल वैद्य:, माजी न्यायाधीश

जयंती २ : आदिवासी विद्यार्थिनीच्या अन्यायाविरुद्ध आवाज आणि संविधानिक मूल्यांची जाणीव करून देणारा चित्रपट अनिल वैद्य:, माजी न्यायाधीश 


मी सहसा थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहत नाही. सामाजिक आशय असलेला चित्रपट असेल, विषय मनाला आणि समाजाला काही प्रश्न विचारणारा असेल, तर मात्र तो पाहण्याचा माझा प्रयत्न असतो. ‘जयंती २’बाबतही असेच झाले.
नाशिकच्या दिव्या टॉकीजमध्ये जाऊन मी ‘जयंती २’ पाहिला. चित्रपटगृहातून बाहेर पडलो तेव्हा मनात एक विचार ठाम झाला—या चित्रपटावर समीक्षा लिहायची आणि समाजाला आवाहन करायचे की, प्रत्येकाने हा चित्रपट पाहावा.
कारण हा केवळ चित्रपट नाही; हा आपल्या समाजाच्या वर्तमानाचे आरसे दाखवणारा चित्रपट आहे.
चित्रपट पाहताना अनेक प्रसंगांनी मला अंतर्मुख केले. काही प्रसंगांमध्ये मी अक्षरशः भावूक झालो. नकळत डोळ्यांत अश्रू आले. पडद्यावर घडणारी घटना केवळ पायल मरकामची वाटत नव्हती; ती आपल्या शिक्षणव्यवस्थेतील, समाजातील आणि मानसिकतेतील अनेक न बोलल्या गेलेल्या प्रश्नांची जाणीव करून देत होती.

आणि चित्रपटगृहाबाहेर पडताना मनात आणखी एक भावना होती—अशा सामाजिक जाणीव असलेल्या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या निर्मात्यांचा आणि संपूर्ण टीमचा अभिमान वाटतो ‘जयंती २’ हा केवळ मनोरंजनासाठी तयार केलेला चित्रपट नाही; तर शिक्षण क्षेत्रातील जातीय भेदभाव, आरक्षणाविषयीचे गैरसमज, विद्यार्थ्यांमध्ये रुजणारी जातीय मानसिकता आणि त्यामागील राजकीय हस्तक्षेप यावर थेट भाष्य करणारा सामाजिक आशयाचा चित्रपट आहे. 

पायल मरकाम या आदिवासी विद्यार्थिनीच्या वाट्याला आलेल्या अन्यायाला वाचा फोडणारी ही कथा आहे. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न घेऊन ती महाविद्यालयात येते. मात्र तिच्या गुणवत्तेपेक्षा तिची जात आणि तिला मिळालेले आरक्षण हा चर्चेचा विषय बनतो. ‘आरक्षणामुळेच तिला प्रवेश मिळाला’, या पूर्वग्रहातून तिच्याकडे पाहिले जाते. तिचा अपमान होतो आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्यानंतर परिस्थिती अशी निर्माण होते की, अन्याय करणाऱ्यांऐवजी अन्यायाला विरोध करणाऱ्या पायलवरच कारवाई होते. तिला महाविद्यालयातून बडतर्फ केले जाते.

यातून चित्रपट एक मूलभूत प्रश्न उपस्थित करतो—
शिक्षणसंस्था विद्यार्थ्यांना ज्ञान आणि विवेक देण्यासाठी आहेत की समाजातील पूर्वग्रह अधिक दृढ करण्यासाठी? पायलच्या व्यक्तिरेखेतून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी, सामाजिक असमानता आणि आरक्षणाकडे पाहण्याच्या पूर्वग्रहपूर्ण दृष्टिकोनाचे वास्तव समोर येते. आरक्षण म्हणजे कोणावर केलेली कृपा नसून ऐतिहासिक सामाजिक व शैक्षणिक विषमतेवर मात करण्यासाठी संविधानाने स्वीकारलेले एक साधन आहे, ही जाणीव चित्रपट करून देतो. चित्रपटाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ‘मेरिट’ आणि ‘आरक्षण’ यांच्यात उभा केला जाणारा कृत्रिम संघर्ष. केवळ गुणांची तुलना करून सामाजिक वास्तव समजून घेता येत नाही. 

संधींची समानता आणि संधी मिळण्यापूर्वीची सामाजिक परिस्थिती यांचाही विचार करावा लागतो. या चर्चेला चित्रपटाने महाविद्यालयीन वातावरणाच्या माध्यमातून प्रभावीपणे पुढे  पायलच्या अन्यायाला साथ देणाऱ्या व्यक्तिरेखा पायल जाधव हिने पायल मरकामची भूमिका साकारली आहे. तिच्या व्यक्तिरेखेत अन्यायाची वेदना, संताप, स्वाभिमान आणि संघर्षशीलता दिसते. पायलला केवळ ‘पीडित विद्यार्थिनी’ म्हणून न दाखवता स्वतःच्या हक्कासाठी प्रश्न विचारणारी आणि अन्यायाला विरोध करणारी तरुणी म्हणून चित्रित केले आहे. तिच्या अभिनयात या भावनांचे विविध पैलू जाणवतात. ती गावात जाऊन तांदळाची नवीन जात शोधून काढते. तिला सरकारतर्फे पुरस्कार दिल्या जातो. ही बाब बडतर्फ करणाऱ्या महाविद्यालयाला माहीत होते. त्याला परत तिला बोलावून सन्मान केल्या जातो. अन्यायाविरुद्ध चौकशी करणारी प्राध्यापिका पायल विरुद्ध अन्याय  झाला असा खरा अहवाल देते त्या मुळे पायलला परत महाविद्यालयात प्रवेश दिला जातो.

ऋतुराज वानखेडे — संत्या

‘जयंती’मधील संत्या या व्यक्तिरेखेचे पुढचे पर्व येथेही दिसते. पायलच्या प्रश्नाला केवळ एका विद्यार्थिनीचा प्रश्न न मानता त्यामागील सामाजिक वास्तव समजून घेण्याची भूमिका संत्या घेतो. पायलच्या न्यायासाठी तो उभा राहतो.

प्रियदर्शिनी इंदलकर — तनुजा
तनुजा ही पायलच्या संघर्षाला समजून घेणारी आणि तिच्या बाजूने उभी राहणारी महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. अन्याय समोर दिसत असताना गप्प न बसता त्याला प्रश्न विचारण्याची भूमिका ती घेते. प्रियदर्शिनी इंदलकरने ही भूमिका प्रभावीपणे साकारली आहे.
रोहिणी हट्टंगडी — महाविद्यालयाच्या प्राचार्य

महाविद्यालयीन प्रशासनाचे प्रतिनिधित्व करणारी त्यांची व्यक्तिरेखा कथानकात महत्त्वाची आहे. पायलच्या प्रकरणातून प्रशासन, अधिकार आणि न्याय यांच्यातील संघर्ष अधोरेखित होतो.

देविका दफ्तरदार — प्रा. गिरीजा
प्राध्यापिका म्हणून त्यांची व्यक्तिरेखा महाविद्यालयीन व्यवस्थेतील शिक्षकांची भूमिका आणि विद्यार्थ्यांशी असलेले नाते यावर प्रकाश टाकते.
विजय निकम — मनोहर साहेब

राजकीय हस्तक्षेपाचे प्रतिनिधित्व करणारी महत्त्वाची. छान अभिनय.व्यक्तिरेखा. महाविद्यालयीन प्रश्न राजकीय शक्तीशी जोडला गेल्यानंतर पायलचा संघर्ष अधिक व्यापक बनतो.

राजकुमार जरांगे — प्रताप

मनोहर साहेबांचा हस्तक म्हणून प्रतापची व्यक्तिरेखा राजकीय दबाव आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रणेचे चित्रण करते.

शरद जाधव — प्रा. चव्हाण
किरण काशिनाथ — प्रा. हेमंत माने
योगिनी पोफळे — प्रा. प्रतिभा थोरात
नितीन बनसोडे — प्रा. जावेद
अक्षय खोब्रागडे — छोटू
सौरभ बिरमवार — सौरभ
शुभम गौतम — शुभम

या सर्व व्यक्तिरेखा महाविद्यालयीन वातावरण, विद्यार्थीविश्व आणि कथानकातील विविध सामाजिक दृष्टिकोनांना पुढे आणतात. 

‘जयंती २’चे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट केवळ जातीय भेदभाव दाखवून थांबत नाही. तो समता, सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, बंधुता आणि संविधानिक हक्क यांची जाणीव करून देतो.

जात ही व्यक्तीच्या गुणवत्तेचे मोजमाप नाही. आरक्षणामुळे एखाद्या विद्यार्थ्याची क्षमता कमी होत नाही. उलट, सामाजिक विषमता लक्षात न घेता केवळ ‘मेरिट’ची भाषा करणे हेच वास्तवाकडे डोळेझाक करणारे ठरू शकते, हा विचार चित्रपटातून पुढे येतो.

विशेषतः आजच्या विद्यार्थ्यांनी संविधान केवळ परीक्षेचा विषय म्हणून न शिकता जगण्याचे मूल्य आणि सामाजिक व्यवहाराची दिशा देणारे दस्तऐवज म्हणून समजून घेणे आवश्यक आहे, हा संदेश ‘जयंती २’च्या आशयातून अधोरेखित होतो.

चित्रपटाची जमेची बाजू आणि मर्यादा

चित्रपटाचा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि समकालीन आहे. जातीय भेदभाव, आरक्षण, शिक्षणातील राजकारण आणि संविधानिक मूल्ये यांची सांगड घालण्याचा प्रयत्न दिग्दर्शक शैलेश नरवाडे यांनी केला आहे.

निर्मात्यांनी
निवडलेला विषय आणि त्यातून उपस्थित केलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत. आजकाल कुणी विद्यार्थी पहिल्या बाकावर बसू नको म्हणून आदिवासी विद्यार्थ्याला उठवून देणार नाही असे मला वाटते. कारण तेव्हढे परिवर्त झाले आहे तथापि मानसिकता बदलेली नाही.

‘जयंती २’ हा चित्रपट पाहून बाहेर पडताना प्रेक्षकाने केवळ कथा किंवा अभिनय लक्षात ठेवू नये; तर स्वतःला काही प्रश्न विचारावेत—आपण अजूनही विद्यार्थ्याकडे त्याच्या गुणवत्तेपेक्षा त्याच्या जातीने पाहतो का? आरक्षणाचा इतिहास आपण समजून घेतला आहे का? अन्याय होत असताना आपण गप्प राहतो का? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आपल्या शिक्षणातून संविधानिक मूल्ये प्रत्यक्ष जीवनात उतरली आहेत का?

पायल मरकामचा संघर्ष म्हणून सुरू झालेली ही कथा शेवटी प्रत्येक विद्यार्थ्याच्या सन्मानाचा, समान संधीचा आणि संविधानाने दिलेल्या समतेच्या अधिकाराचा प्रश्न बनते. म्हणूनच ‘जयंती २’ हा केवळ आरक्षणावरचा चित्रपट नाही; तो सामाजिक पूर्वग्रहांना प्रश्न विचारणारा आणि संविधानिक मूल्यांची शिकवण देणारा चित्रपट आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे ही केवळ व्यक्तीची भूमिका नसून लोकशाही समाजातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे—हा या चित्रपटाचा सर्वांत महत्त्वाचा संदेश आहे.
निर्माता
दिग्दर्शक, लेखक: शैलेश बळीराम नरवाडे आणि सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन 
सर्वांनी छान अभिनय केला आहे.

हा चित्रपट भारतीय सर्व समाजातील लोकांनी बघितला पाहिजे. आरक्षण विरोधकांना आत्मचिंतन करायला भाग पाडणारा आणि आरक्षण समर्थकांची मनोभूमिका भक्कम करणारा चित्रपट आहे. नक्कीच बघा.

अनिल वैद्य 
माजी न्यायाधीश 
14 सप्टेंबर 2026

सर्वत्र व्हायरल करा असे आवाहन 
अनिल वैद्य


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.