फडणवीसांचा खरा चेहरा उघड? "राज ठाकरेंकडून सभा घेतल्या अन् त्यांच्याच मुलाला पाडले!" — जरांगेंचा घणाघात
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील लोकांवर मोगलाईपेक्षा वाईट काळ आणू शकतात. फडणवीस राजकारणी आणि उद्योगपतींना ईडी लावून उद्ध्वस्त करत आहेत. त्यांना वाटतील तशा केसेस करत आहेत असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केला.
एवढंच नाही राज ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करतही त्यांनी एक आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.
देवेंद्र फडणवीस यांची मग्रुरी….
देवेंद्र फडणवीस यांची मग्रुरी आणि हिटलरशाही मराठा राजकारणी सहन करत असतील तर तुमच्या जिंदगीवर थुकावं लागेल. एवढा मग्रूर शासक राज्याला परवडणारा नाही. भाजपातील नेत्यांनाही माझं हे सांगणं आहे की त्यांनीही ही गोष्ट समजून घ्यावी. एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचे देवेंद्र फडणवीसांकडून काय हाल सुरु आहेत, हेदेखील जरा खोलात जाऊन बघा असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी हे विधान केलं आहे.
राज ठाकरेंकडून प्रचार करुन घेतला आणि त्यांच्या पोराला पाडलं-जरांगे
२०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंकडून प्रचार करुन घेतला आणि निवडणुकीत त्यांच्या पोराला पाडलं. असं म्हणत मनोज जरांगेंनी अमित ठाकरेंच्या पराभवावरुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्याकडून प्रचार आणि भाषणं करुन घेतली. त्यानंतर राज ठाकरे यांच्याच पोराला निवडणुकीत पाडलं. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या काही लोकांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची तिकीटं द्यायला लावली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या त्यांचे असे १० ते १२ आमदार आहेत. उद्धव ठाकरे साहेबांचाही फडणवीसांनी वापर करुन घेतला असाही आरोप मनोज जरांगेंनी केला.
तुम्ही काय दिवे लावलेत ते सांगा
भाजपाकडून सातत्याने शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने मराठा समाजासाठी काय केलं, असा प्रश्न विचारला जातो. पण तुम्ही सत्तेत असून मराठ्यांसाठी काय दिवे लावलेत? ते सांगा असा सवाल मनोज जरांगेंनी उपस्थित केला. अत्याचारी आंदोलन मोडणारा राज्यकर्ता संपवावा लागतो तेव्हा राज्य सुखी होतं. रावणाला रामाने मारलं आणि प्रजा सुखी झाली. कौरवांचा अत्याचार पांडवांनी मोडून काढला आणि ते सुखी झाले. अत्याचार झाला म्हणून कंसाचा वध करावा लागला. कालियाने समुद्र दूषित केला म्हणून कृष्णाला त्याला मारावं लागलं अशीही उदाहरणं मनोज जरांगेंनी दिली. आता मनोज जरांगेंच्या या टीकेला फडणवीस उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.