आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील विनायक ढंग टोळी सांगली जिल्ह्यातून २ वर्षांसाठी हद्दपार; पोलीस अधीक्षक तुषार दोशींचे आदेश
मिरज :-आगामी गणेशोत्सव शांततेत आणि निर्विघ्न पार पडावा, तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सांगली जिल्हा पोलीस दलाने गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कठोर पाऊल उचलले आहे. मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणाऱ्या विनायक बबन ढंग आणि त्याच्या इतर ४ साथीदारांच्या टोळीला सांगली जिल्ह्यातून २ वर्षांसाठी हद्दपार (तडीपार) करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी जारी केले आहेत.
तडीपार केलेल्या संशयितांची नावे:
विनायक बबन ढंग (वय १९, टोळीप्रमुख, रा. लक्ष्मी मंदिराच्या मागे, गणेश तलाव, मिरज)
रोहित राजू घोडके ऊर्फ गोसावी (वय २६, रा. गोसावी गल्ली, गणेश तलावाजवळ, मिरज)
अरुण शंकर घोडके ऊर्फ गोसावी (वय १९, रा. गोसावी गल्ली, गणेश तलावाजवळ, मिरज)
करण राजू घोडके ऊर्फ गोसावी (वय २९, रा. गोसावी गल्ली, गणेश तलावाजवळ, मिरज)
अथर्व अभिजित माने (वय १९, रा. लक्ष्मी मंदिराच्या मागे, गणेश तलाव, मिरज)
गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी आणि कारवाई:
या टोळीविरुद्ध सन २०२२ ते २०२६ या कालावधीत बेकायदेशीर जमाव जमवणे, घातक शस्त्रांसह हल्ला करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, अश्लील वर्तन, वाहनांची तोडफोड करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, तसेच अनुसूचित जाती व जमातीतील व्यक्तींना जातीवाचक शिवीगाळ करून गंभीर दुखापत करणे अशा स्वरूपाचे अनेक गंभीर शरीर आणि मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत.
कायदा व सुव्यवस्थेला न जुमानणाऱ्या या टोळीचा समूळ उच्चाटन करण्यासाठी मिरज शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा (तत्कालीन) यांनी या प्रस्तावाची सखोल चौकशी करून अहवाल सादर केला. दाखल गुन्हे, प्रतिबंधात्मक कारवाया आणि संशयितांच्या हालचालींचा विचार करून, तसेच नैसर्गिक न्यायतत्वांचा अवलंब करत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या ५ जणांना २ वर्षांसाठी सांगली जिल्ह्यातून तडीपार करण्याचा अंतिम आदेश दिला.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे व प्रणिल गिल्डा (तत्कालीन), स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, मिरज शहरचे पोलीस निरीक्षक किरण चौगले, तसेच पोलीस अंमलदार बसवराज शिरगुप्पी, दीपक गट्टे, गजानन बिरादार, असिफ सय्यद आणि प्रवीण वाघमोडे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.
गणेशोत्सवाच्या काळात गुन्हेगारी टोळ्यांवर बारकाईने लक्ष ठेवून अशीच कडक कारवाई पुढेही सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.