सांगली सिव्हिलमध्ये रुग्णांची उघड लुबाडणूक: शासकीय पगारावर डल्ला अन् खाजगी लॅबचे कमिशन; एजंटच्या जिवावर लॅब सहाय्यकाचा 'डबल धमाका'!
सांगली :-सांगली येथील वसंतदादा पाटील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) सध्या रुग्णांच्या सेवेऐवजी खाजगी दलालीचे मुख्य केंद्र बनले आहे. येथे कार्यरत असलेला एक लॅब सहाय्यक शासकीय नियमांना हरताळ फासत रुग्णांची आणि त्यांच्या हवालदिल नातेवाईकांची उघड्या डोळ्यांनी लूट करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अशी चालते रुग्णांची फसवणूक:
खाजगी मुलांची बेकायदेशीर नेमणूक: या लॅब सहाय्यकाने स्वतःच्या हाताखाली रक्त आणि लघवीचे सॅम्पल गोळा करण्यासाठी थेट खाजगी मुले ठेवली आहेत.
वार्डात जाऊन व्हिजिटिंग कार्डचे वाटप: हा सहाय्यक स्वतः किंवा त्याच्यामार्फत ही मुले थेट रुग्णांच्या वार्डात पाठवतो. नातेवाईकांना "हा मुलगा येईल त्याच्याकडेच सॅम्पल द्या" असे सांगून एका विशिष्ट खाजगी लॅबचे व्हिजिटिंग कार्ड हातावर टेकवले जाते. "तिथे स्वस्तात टेस्ट करून मिळतील" असे खोटे आमिष दाखवून रुग्णांची दिशाभूल केली जाते.
दर वाढवून थेट पैशांची लूट: सॅम्पल खाजगी लॅबमध्ये पोहोचताच खरा खेळ सुरू होतो. ज्या टेस्टची किंमत ३०० रुपये आहे, तिथे अडाणी अन् अडचणीत सापडलेल्या नातेवाईकांकडून सर्रास ४०० रुपये वसूल केले जात आहेत.
शासकीय पगार, खाजगी कमिशन अन् खाजगी हॉस्पीटलमध्ये नोकरी!
हा लॅब सहाय्यक सध्या तिहेरी कमाई करत 'मालामाल' होत आहे. एकीकडे शासनाचा भरभक्कम पगार खिशात घालायचा, दुसरीकडे खाजगी लॅबकडून जाडजूड कमिशन उकळायचे आणि भरारी मारत एका खाजगी रुग्णालयातही नोकरी करायची, असा याचा बिनधास्त कारभार सुरू आहे.
वरिष्ठांचे 'अभय' की अर्थपूर्ण दुर्लक्ष?
एवढा मोठा गैरप्रकार रुग्णालयाच्या नाकाखाली सुरू असताना प्रशासनाला याची माहिती नाही का? की वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या 'कृपाशीर्वादाने'च ही दलाली फुलली आहे? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
गरिबांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या या भ्रष्ट लॅब सहाय्यकावर आणि त्याच्या टोळीवर प्रशासनाने तत्काळ कडक कारवाई करून त्याचा कायमचा बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा पीडित रुग्णांच्या नातेवाईकांनी दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.