🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

४१ हजार कोटींची संपत्ती, पण वाद घरातच! ग्वाल्हेरच्या शिंदे राजघराण्यात नेमके काय घडले?

४१ हजार कोटींची संपत्ती, पण वाद घरातच! ग्वाल्हेरच्या शिंदे राजघराण्यात नेमके काय घडले?

ग्वाल्हेर; वृत्तसंस्था : शिंदे राजघराण्यातील ४१ हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या हक्कावरून सुरू असलेल्या दीर्घकाळच्या कायदेशीर वादाला आता नवे वळण मिळाले आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या चुलत बहीण प्रतिमादेवी यांनी या प्रकरणात दाखल केलेला अर्ज ग्वाल्हेरच्या एडीजे न्यायालयाने १० सप्टेंबर रोजी मंजूर केला.

त्यामुळे समझोत्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रतिमादेवींचे म्हणणे ऐकणे न्यायालयासाठी आवश्यक ठरणार आहे.

राजघराण्यातील सदस्य ऊषाराजे राणा यांनी संपत्तीच्या समझोत्यासंदर्भात न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर निर्णय घेण्यापूर्वी आपली बाजूही ऐकण्यात यावी, अशी मागणी प्रतिमादेवी यांनी केली होती. त्यांच्या अर्जाला न्यायालयाने मंजुरी दिल्याने आता त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय समझोत्याच्या अर्जावर अंतिम निर्णय घेता येणार नाही. प्रतिमादेवी यांनी प्रस्तावित समझोत्याला आणि त्यामध्ये आपली कथित संमती दर्शविल्याला आक्षेप घेतला आहे. या प्रक्रियेत त्यांच्या आई पद्मावतीराजे यांच्या कायदेशीर हक्कांकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. संपत्तीच्या विभाजनात आईच्या हिश्श्याशी संबंधित अधिकारांचा योग्य विचार व्हावा, अशी त्यांची भूमिका आहे.

दुसरीकडे, शिंदे कुटुंबीयांच्या वतीने न्यायालयात वेगळी बाजू मांडण्यात आली आहे. प्रतिमादेवी यांना प्रस्तावित समझोत्यातील सर्व बाबींची पूर्वकल्पना होती आणि त्यांनी सहमती दर्शवून संबंधित कागदपत्रांवर स्वाक्षऱ्याही केल्या होत्या, असा युक्तिवाद केला आहे. यासाठी जुन्या कागदपत्रांसह सहमतीपत्रे आणि कौटुंबिक छायाचित्रेही न्यायालयासमोर सादर केल्याचे सांगण्यात आले. शिंदे राजघराण्याच्या मौल्यवान स्थावर मालमत्तांच्या वाटणी आणि अधिकारांवरून हा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आत्या राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, माजी मंत्री यशोधरा राजे आणि ऊषा राजे राणा यांच्यात या संपत्तीशी संबंधित कायदेशीर संघर्ष सुरू आहे.

या प्रकरणात आता स्वर्गीय पद्मावती राजे यांच्या कन्या प्रतिमा देवी सहभागी झाल्याने वादाची व्याप्ती आणखी वाढली आहे. प्रतिमा देवींच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या आईच्या हिस्स्याशी संबंधित कायदेशीर अधिकारांचाही संपत्तीच्या विभाजनात विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे यापुढील सुनावणीत या अधिकारांचा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.

७ ऑक्टोबरला सुनावणी

१० सप्टेंबरच्या सुनावणीनंतर न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख ७ ऑक्टोबर २०२६ निश्चित केली आहे. या सुनावणीत प्रतिमादेवींची बाजू, त्यांनी सादर केलेली कागदपत्रे, त्यांच्या आक्षेपांचा न्यायालयाकडून विचार केला जाणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.