राज्यातील आदिवासी आश्रम शाळांची दुरावस्था आणि विद्यार्थ्यांची हेळसांड आंदोलनाचा विषय बनला आहे. या संदर्भात राज्यभर विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. त्यात एका धक्कादायक प्रकाराची भर पडली आहे. राज्यातील आदिवासी आश्रम शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींवर सुट्टी वरून परतल्यावर प्रेग्नेंसी टेस्ट करणे सक्तीचे करण्यात आले आहे. गेले काही दिवस हा वादाचा विषय बनला होता. आता त्यावरून विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजीचा स्पोर्ट झाला आहे.
आदिवासी आश्रम शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी प्रामुख्याने अल्पवयीन असतात. त्या सणासुदीला किंवा अन्य वेळी सुट्टीवर गेल्यास आपल्या कुटुंबीयांमध्ये जातात. घरून पुन्हा शाळेत येताना त्यांना ही वैद्यकीय सक्ती करण्यात आली आहे.
आदिवासी आश्रम शाळांमध्ये नियमित शैक्षणिक रजा, सुट्ट्या असतात. या कालावधीत आश्रम शाळांतील विद्यार्थिनी आपल्या घरी जातात. अशावेळी तेरा वर्षांवरील विद्यार्थिनींना परत येताना प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा अन्य शासकीय रुग्णालयातून स्वतः प्रेग्नेंसी टेस्ट करून घ्यावी लागते. त्यामुळे अनेकदा अपमान जनक भावना निर्माण होते, अशी खंत पालक आणि या विद्यार्थिनींनी व्यक्त केली आहे.
अन्य होस्टेल्स किंवा विद्यापीठांच्या वस्तीगृहात वयस्कर विद्यार्थिनी असतात. तेथे देखील अशा प्रकारची सक्ती किंवा नियम नाही. फक्त आदिवासी आश्रम शाळांसाठीच हा नियम आहे. त्यामुळे हा आदिवासींचा अवमान आहे. त्याचा तातडीने फेरविचार होणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया भारतीय आदिवासी पॅंथर संघटनेचे उपाध्यक्ष तुळशीराम खोटरे यांनी दिली. यासंदर्भात आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी मात्र त्याचा इन्कार केला आहे. विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी केली जाते. प्रेग्नेंसी टेस्ट केली जात नाही असा दावा मंत्र्यांनी केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.