🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खाकीची अरेरावी मोडून काढली! ८ अल्पवयीनांना बेदम मारहाण प्रकरण भोवले; मानवाधिकार आयोगाच्या इशाऱ्यानंतर वरिष्ठ निरीक्षकासह ११ जणांवर गुन्हा दाखल!

खाकीची अरेरावी मोडून काढली! ८ अल्पवयीनांना बेदम मारहाण प्रकरण भोवले; मानवाधिकार आयोगाच्या इशाऱ्यानंतर वरिष्ठ निरीक्षकासह ११ जणांवर गुन्हा दाखल!


पुणे : पुण्यातून खाकी वर्दीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबेगाव पठार पोलीस चौकीत आठ अल्पवयीन मुलांना बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवून त्यांना बेल्टने बेदम मारहाण केल्याप्रकरणी तब्बल ११ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या (SHRC) फॅक्ट फाईंडिंग रिपोर्ट आणि कडक आदेशानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली आहे.

बेल्टने मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ….

मिळालेल्या माहितीनुसार, २० आणि २१ जुलै २०२६ रोजी आठ अल्पवयीन मुलांना (CCL) कायद्याचे उल्लंघन केल्याच्या संशयावरून आंबेगाव पठार पोलीस चौकीत आणण्यात आले होते. या मुलांना बाल कल्याण समितीसमोर हजर न करता बेकायदेशीरपणे पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. तिथे त्यांना बांधून ठेवून बेल्टने अमानुष मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर, यातील काही मुले अनुसूचित जातीची असल्याने त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी अपमानित करण्यात आले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ११ जणांवर FIR
मानवी हक्क आयोगाने या प्रकरणाची 'सुओ मोटो' (Suo Moto) दखल घेतली होती. आयोगाच्या आदेशानंतर गुन्हे अन्वेषण विभागाचे (CID) संकेत गोसावी यांच्या तक्रारीवरून २४ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा (FIR No. 0483/2026) नोंदवण्यात आला. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते, स्नेहल थोरात, पोलीस निरीक्षक निलेश मोकाशी यांच्यासह सात पोलीस अंमलदारांचा समावेश आहे.या सातमध्ये सुनिल हनवटे (पोहवा), दिनेश टापके (पोहवा),मितेश चोरमोले (पोलीस अंमलदार),सागर बोरसे(पोलीस अंमलदार),सोहम रोडेकर - (पोलीस अंमलदार),मंगेश पवार (पोलीस अंमलदार),स्वप्ना भिसे (महिला पोलीस अंमलदार) यांचा समावेश आहे.
अॅट्रॉसिटी आणि बाल न्याय कायद्यांतर्गत कारवाई…

संशयित पोलिसांवर भारतीय न्याय संहिता (BNS), बाल न्याय कायदा २०१५ (कलम ७४, ७५ - क्रूर वागणूक देणे व ओळख उघड करणे) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी) गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास अप्पर पोलीस महासंचालक (Addl. DGP) सुनील रामानंद करत आहेत. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.