🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अकोला सेंट्रल बँकेवर सफाई कर्मचाऱ्याचाच दरोडा; बनावट चावीने १ कोटींचं सोनं लंपास!

अकोला सेंट्रल बँकेवर सफाई कर्मचाऱ्याचाच दरोडा; बनावट चावीने १ कोटींचं सोनं लंपास!


अकोला : शहरातील सेंट्रल बँकेतील १.०७ कोटींच्या सोन्याची अफरातफर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँकेतील सफाई कर्मचाऱ्याने लॉकरची बनावट चावी तयार करून ७१५.०४४ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. ते दुसऱ्या फायनान्स बँकेमध्ये गहाण ठेऊन पैसे मिळवले. या प्रकरणी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

नेमकं घडल काय?
सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रमुख पंकजकुमार कमलाप्रसाद श्रीवास्तव (५२) यांनी पोलिसांत तक्रार दिली. कंत्राटी तत्वावर कार्यरत सफाई कर्मचारी नियुक्त करण्याचे अधिकार श्रीवास्तव यांना आहेत. अग्रसेन भवन समोरील सेंट्रल बँकेच्या शाखेत त्यांनी वैभव कोल्हे याची सफाई कर्मचारी म्हणून नियुक्ती केली. दरम्यान, बँकेच्या डिमांड लोनशी संबंधित व्यवहारात अफरातफर झाल्याचे निदर्शनास आले. तसेच बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्येही गैरव्यवहार झाल्याचे समोर आले. या प्रकरणात एक कोटी ७ लाख २५ हजार ६६० रुपये किमतीचे सुमारे ७१५.०४४ ग्रॅम सोन्याचे दागिन्यांची अफरातफर झाली. या प्रकरणी वैभव धनराज कोल्हे (२९, रा. बोरगाव खुर्द, अकोला) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६ (४) आणि ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या फायनान्स बँकेमध्ये ठेवले गहाण

आरोपी सफाई कर्मचाऱ्याने लॉकरची बनावट चावी तयार केली. त्यानंतर ७१५.०४४ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. ते दागिने दुसऱ्या फायनान्स बँकेमध्ये गहाण ठेऊन त्याने पैसे मिळवले. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. सोन्याच्या दागिन्यांमध्ये अफरातफर केल्याचे आरोपीने मान्य केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? या दृष्टीने पोलीस तपास सुरू आहे.

लॉकरमध्येही दागिने असुरक्षित?
अफरातफर झालेले सोन्याचे दागिने दुसऱ्या फायनान्स कंपनीमध्ये सुरक्षित असल्याची माहिती आहे. ते परत मिळवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दाग-दागिने सुरक्षित राहण्यासाठी ग्राहकांकडून ते बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यात येते. त्यासाठी बँक लॉकरचे भाडे देखील आकारते. आता सेंट्रल बँकेच्या लॉकरमधील दागिन्यासंदर्भातच अफरातफर झाल्याचा प्रकार समोर आल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली. बँकेतील लॉकरमध्ये सुद्धा दागिने सुरक्षित नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.