भुईंज: मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात कर्तव्य बजावताना वीरमरण आलेले पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांनी पतीच्या बलिदानातून प्रेरणा घेत महाराष्ट्र पोलीस दलात उपअधीक्षक पदावर झेप घेतली.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, १७ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांनी हे यश संपादन करून पतीच्या बलिदानाला सलामी दिली. या यशामुळे वाई तालुक्यातील ऐतिहासिक कवठे (ता. वाई) गावाच्या शौर्य परंपरेला नवा सन्मान प्राप्त झाला आहे.
कवठे गावचा नवीन सन्मान कल्पना पवार या वाई तालुक्यातील ऐतिहासिक कवठे गावच्या सून आहेत. देशभक्त किसान वीर (आबासाहेब वीर) यांच्या क्रांतिकारी विचारांचा वारसा लाभलेल्या या गावाने स्वातंत्र्यापासून राष्ट्रसेवेची परंपरा जपली आहे. त्याच परंपरेला कल्पना पवार यांच्या पोलीस दलातील उच्चपदस्थ नियुक्तीमुळे अर्थ आणि गौरव प्राप्त झाला आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात प्रवाशांचे प्राण वाचविताना पोलीस शिपाई अंबादास पवार शहीद झाले. त्या दुःखद घटनेनंतर कल्पना पवार यांनी खचून न जाता कुटुंबाची जबाबदारी सांभाळत पतीच्या देशसेवेचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार केला.तब्बल १७ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांच्या जिद्दीला यश आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २२ एप्रिल २०२५ रोजी कल्पना पवार यांना थेट पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्तीचा आदेश मिळाला. महाराष्ट्रापोलिसांच्या 'सीपीटीपी-१०' अंतर्गत नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत ११ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात प्रशिक्षणार्थी प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.
नवा आदर्श घालून दिला पती अंबादास पवार यांच्या बलिदानांतर संकटांना खंबीरपणे सामोरे जात कल्पना पवार यांनी पोलीस दलात प्रवेश केला. कर्तव्य, धैर्य, जिद्द आणि देशसेवेची भावना या जोरावर त्यांनी विविध आव्हानांचा सामना केला. आता पोलीस उपअधीक्षक पदापर्यंत पोहोचत त्यांनी अनेकांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा हा प्रवास केवळ एका कुटुंबाची संघर्षकथा नसून, कर्तव्यनिष्ठा, त्याग आणि अस्मितेची प्रेरणादायी गाथा ठरली आहे. त्यांच्या यशामुळे कवठे गावासह वाई तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.