फ्रान्स आणि बेल्जियमनंतर इटलीतही बुरखा अन् नकाबवर बंदी; खुद्द पंतप्रधान मेलोनींची घोषणा
फ्रान्स आणि बेल्जियमच्या पावलावर पाऊल ठेवत आता इटलीनेही सार्वजनिक ठिकाणी आणि शाळांमध्ये बुरखा व नकाबवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. खुद्द इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी रविवारी एका कार्यक्रमात याविषयी अधिकृत घोषणा केली.
मेलोनी सरकार लवकरच यासंदर्भातील एक नवीन विधेयक संसदेत सादर करणार आहे. या नव्या नियमानुसार शाळांमध्ये चेहरा झाकण्यावर पूर्ण प्रतिबंध असणार असून, प्रत्येक वर्गातील परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येवरही मर्यादा घातली जाणार आहे.
भूमध्य समुद्राच्या मधोमध वसलेला इटली हा युरोपियन देशांपैकी एक असा देश आहे, जिथे मोठ्या प्रमाणावर परदेशी प्रवासी येतात. त्यामुळे स्थलांतर हा इटलीच्या राजकारणातील नेहमीच एक कळीचा मुद्दा राहिला आहे. विशेषतः मुस्लिमबहुल देशांतून येणाऱ्या लोकांना स्थानिक संस्कृतीत सामावून घेणे, धार्मिक प्रतीके, नागरिकतेचे नियम आणि इमिग्रेशन धोरणांवर इटलीमध्ये सतत वाद-विवाद घडत असतात.
लवकरच संसदेत येणार नवीन बिल
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी स्पष्ट केले की, लवकरच संसदेत एक महत्त्वाचे विधेयक आणले जाईल. या बिलाचा मुख्य उद्देश क्लासरूममध्ये बुरखा आणि नकाब घालण्यावर बंदी घालणे हा आहे. याशिवाय, ज्या परदेशी विद्यार्थ्यांना इतालवी भाषा बोलता येत नाही किंवा ज्यांना शाळेच्या वातावरणात जुळवून घेण्यात अडचणी येतात, त्यांच्या पालकांसाठी स्थानिक भाषा शिकणे अनिवार्य केले जाणार आहे. इतर युरोपियन युनियन देशांच्या नियमांच्या धर्तीवरच हे पाऊल उचलण्यात आले आहे.
प्रत्येक वर्गात परदेशी विद्यार्थ्यांची संख्या होणार निश्चित
मेलोनी यांनी त्यांच्या पक्षाच्या 'ब्रदर्स ऑफ इटली' या युवा संघटनेच्या 'फिनिक्स' या महोत्सवात भाषण करताना सांगितले की, संसदेत येणाऱ्या प्रस्तावानुसार प्रत्येक वर्गातील परदेशी विद्यार्थ्यांची कमाल संख्या कायद्याद्वारे निश्चित केली जाईल.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण देताना म्हटले की, इटलीच्याच शाळांमधील वर्गांमध्ये जर स्थानिक इटालियन मुले स्वतःला अल्पसंख्याक समजू लागली आणि दुःखी किंवा एकाकी झाली, तर हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. हा प्रकार असाच सुरू राहू देणे योग्य नाही. काही लोक याला 'एकत्र येणे किंवा जुळवून घेणे' (इंटीग्रेशन) असे म्हणतात, पण हा केवळ एक दिखावा आणि सोयीस्कर खोटेपणा आहे. जे लोक राजकारण करतात आणि घरात बसून इतरांना सल्ले देतात, तेच अशा गोष्टींना खतपाणी घालतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.