दिशा सालियन प्रकरण: राणे पिता-पुत्रच 'प्रत्यक्षदर्शी'? आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाचे ७ तिखट प्रश्न!
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी वकिलांसोबत 'मातोश्री'वर जाऊन आदित्य ठाकरेंना 500 कोटींची मानहानीची नोटीस दिली आहे. शनिवारच्या या नाट्यमय घडामोडींनंतर आता शिवसंचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे यांनी या प्रकरणामध्ये काही कागदपत्रांचे फोटो पोस्ट करत नारायण राणे आणि नितेश राणे हे या प्रकरणात प्रथमदर्शनी होते तर त्यांनी हा सारा प्रकार थांबवला का नाही?
असा सवाल केला आहे. तसेच या नोटीस प्रकरणाला आम्ही फार गांभीर्याने घेत नसून काय ते कायदेशीर उत्तर आमच्याकडून दिलं जाईल असं चित्रे यांनी स्पष्ट केलं आहे.
नारायण राणे आणि नितेश राणे हे प्रथमदर्शनी होते असा उल्लेख
आदित्य ठाकरेंना नोटीस देण्यात आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अखिले चित्रेंनी, "आम्ही त्यांना फार सिरीअसली घेतलं नाहीये. आमच्या वकिलांनी नोटीस स्वीकारली. त्याला जे काही कायदेशीर कठोर उत्तर द्यायचं आहे पुढील काही दिवसात आमच्याकडून दिलं जाईल," अशी प्रतिक्रिया नोंदवली. "खरी परिस्थिती जनतेसमोर आली आहे. कोर्टात जे दस्तऐवज दिलं आहे त्यामध्ये नारायण राणे आणि नितेश राणे हे प्रथमदर्शनी होते. आजपर्यत कायदेशीर प्रक्रिया आपण पाहिली असेल. आत्तापर्यंत पोस्टने नोटीस दिली जाते. हा तमाशा, सर्कस लावलेली आहे. कायदेशीर प्रक्रिया आहे हे कोर्टसुद्धा पाहत आहे. आम्ही फार सिरीयस घेतलं नाही. जी रंगवलेली कहाणी आहे त्याला उतर आमच्याकडून येत्या काही दिवसात दिलं जाईल," असंही अखिल चित्रे म्हणाले.
राणेंनी खून होण्यापासून थांबवलं का नाही?
"जर ते दोघे (नारायण राणे आणि नितेश राणे) तिकडे होते तर ते तिथे काय करत होते? खून झाला तर त्यांनी ते थांबवलं का नाही? जर तिथे काही घृणास्पद प्रकार होत होता तर तो थांबवण्याचा प्रयत्न त्यांनी का केला नाही? मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला वरुन पडून तर ते थांबवलं का नाही? रुग्णवाहिका का बोलावली नाही? वैद्यकीय मदत का दिली नाही? पोलिसांना वाटतं किंवा योग्य यंत्रणेला त्यांनी कळवलं का नाही? अचानक आम्हाला एक्झिव्हीटच्या माध्यमातून आम्हाला कळतंय की ते प्रथमदर्शनी आहेत, साक्षीदार आहेत," असे प्रश्न अखिल चित्रेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केले.
पुरावे असतील तर द्या
"जर ते दोघे (नारायण राणे आणि नितेश राणे) तिथे होते तर कायदेशीर प्रक्रिया केली पाहिजे. मीडियासमोर वायफळ बडबड त्यांनी केली आहे. कायदेशीर कारवाई आता यापुढे आम्ही करणार. कधी पेन ड्राईव्ह आहे तर कधी सीसीटीव्हीआहे म्हणाले. पुराव्याशिवाय काहीही बोलत बसतात," अशी टीका राणे पिता-पुत्रावर केली. नारायण राणे आणि नितेश राणेंनी सीबीआयसंदर्भात केलेल्या विधानांवरुन, "त्यांच्याकडे पुरावे असतील तर जाऊन पुरावे द्यावे. दूध का दुध पाणी का पाणी होईल," असंही अखिल चित्रे म्हणाले.
यापूर्वीच अखिल चित्रेंनी सोशल मीडियावर दिशा सालियन प्रकरणामध्ये न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांचे स्क्रीनशॉट पोस्ट करत राणेंवर निशाणा साधल्याचं दिसून आलं. "महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण देशाला हादरवून टाकणारा, न्यायालयीन कार्यवाहीत सादर करण्यात आलेला दस्तऐवज पाहा. सतीश सालियन यांच्या वकिलांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये, दिनांक 12 जानेवारी 2024 रोजीच्या एक्झिबीट 'ए' मधील पान क्रमांक 233, मुद्दा क्रमांक दोनमध्ये असा उल्लेख करण्यात आला आहे की: "कु. दिशा सलियन यांचा मृत्यू नैसर्गिक नसून सामूहिक अत्याचार करून नंतर खून करण्यात आल्याबाबतचे आरोप प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मा. केंद्रीय मंत्री नारायण राणे, मा. आमदार श्री. नितेश राणे व इतर अनेक लोकांनी केले आहेत." याचा सरळ-सरळ अर्थ होतो कि, त्या सामूहिक अत्याचाराचे आणि खुनाचे प्रत्यक्षदर्शी केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार श्री. नितेश राणे आहेत. सतीश सालियन यांच्या वकिलांनी सादर केलेल्या या कागदपत्रातील उल्लेखाच्या अनुषंगाने काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात," असं अखिल चित्रेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. पुढे अखिल यांनी काही प्रश्न विचारले आहेत. ते खालीलप्रमाणे:
1) असा सामूहिक अत्याचार होताना हे प्रत्यक्षदर्शी महाशय शांत राहून अत्याचार का पहात बसले होते? हस्तक्षेप का केला नाही?
2) खून होताना दिसतोय तरी मान्यवर प्रत्यक्षदर्शीने ते रोखण्यासाठी काहीच का केलं नाही?
3) सामूहिक अत्याचार पाहिल्यानंतर पीडितेला तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी कोणती पावले उचलण्यात आली?
4) अशी घटना प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा असल्यास, त्यानंतर तातडीने पोलिसांशी संपर्क का साधण्यात आला नाही?
5) असा अत्याचार आणि खून पाहिल्यानंतर सर्वसामान्य माणसांच्या मानसिक स्थितीवर काहीअंशी परिणाम होतो मग प्रत्यक्षदर्शीं इतके नोर्मल कसे?
6) असेच यांनी किती सामूहिक अत्याचार आणि खून आयुष्यात प्रत्यक्षदर्शी म्हणून पाहिले आहेत?
7) असा भयंकर अत्याचार आणि खून प्रत्यक्ष पाहिल्यानंतरही एखादी व्यक्ती पूर्णपणे सामान्यपणे वागत असेल, तर अशा वर्तनाला मानसशास्त्रीय भाषेत काय म्हणतात?
"असे अनेक गहण प्रश्न महाराष्ट्राला पडणार आहेत. याचं उत्तर मिळायलाच हवं. कारण खालील कागदपत्रं सोशल मीडिया किंवा मीडिया ट्रायलसाठीचा स्क्रिनशॉट नाही तर कोर्टात धडधडीत न्यायालयीन पुरावा म्हणून दाखल केलेले कागदपत्रं आहेत," असं अखिल चित्रे म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.