🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कामचुकार आरोग्य अधिकाऱ्यांना चाप; कामगिरी सुधारली नाही तर पदोन्नती अन् पसंतीच्या जागा विसरा!​सेवाज्येष्ठता नाही, प्रत्यक्ष कामाचा 'रिझल्ट' ठरणार एकमेव निकष; मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आदेश​

कामचुकार आरोग्य अधिकाऱ्यांना चाप; कामगिरी सुधारली नाही तर पदोन्नती अन् पसंतीच्या जागा विसरा!
​सेवाज्येष्ठता नाही, प्रत्यक्ष कामाचा 'रिझल्ट' ठरणार एकमेव निकष; मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आदेश

मुंबई :-महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागात आता केवळ नोकरीची वर्षे मोजून पदोन्नती किंवा पसंतीच्या ठिकाणी बदल्या मिळवणे शक्य होणार नाही. आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील सर्व अधिकाऱ्यांचे आता ३६० अंश मूल्यांकन (रँकिंग) केले जाणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबतचे स्पष्ट आदेश दिले असून, अधिकाऱ्यांच्या तीन वर्षांतील प्रत्यक्ष कामगिरीच्या आधारे त्यांची श्रेणी निश्चित केली जाणार आहे. यामुळे केवळ सेवाज्येष्ठता न पाहता गुणवत्तेला प्राधान्य देऊन प्रशासकीय नियुक्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

​असे होणार १०० गुणांचे 'रिपोर्ट कार्ड':

ज्या आरोग्य अधिकाऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजी किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण होत आहे, त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाईल. २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या तीन वर्षांतील कामाचा ताळेबंद मांडून १०० गुणांपैकी त्यांचे रँकिंग ठरेल. या गुणांच्या आधारे अधिकाऱ्यांची चार श्रेणींमध्ये (A, B, C, D) विभागणी केली जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, हे गुणांकन दरवर्षी केले जाणार आहे.

​गुणवत्ता तपासण्याचे मुख्य निकष:

​आर्थिक व्यवस्थापन: जिल्हा वार्षिक नियोजन, राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि सीएसआर (CSR) निधीचा प्रभावी वापर.


​रुग्णालय व्यवस्थापन: औषध पुरवठा, रुग्णांचा आहार, स्वच्छता आणि कंत्राटी मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर.
​आपत्कालीन कामगिरी: साथीचे आजार, नैसर्गिक आपत्ती आणि अपघातांच्या काळात दाखवलेले तत्पर नेतृत्व.
​शासकीय योजनांची अंमलबजावणी: 'माझे गाव आरोग्य संपन्न गाव', 'अरुणोदय-सिकलसेलमुक्त महाराष्ट्र', 'कर्करोगमुक्त महाराष्ट्र' यांसारख्या महत्त्वाकांक्षी अभियानांतील योगदान.

​जनतक्रार निवारण: लोकाभिमुखता, संवादकौशल्य आणि तक्रारींचे वेळेत निवारण.

​वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चाबूक:

या संपूर्ण मूल्यांकन प्रक्रियेची आणि पारदर्शक अंमलबजावणीची जबाबदारी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक आणि आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या नव्या निर्णयामुळे आरोग्य यंत्रणेतील प्रशासकीय सुस्तपणा दूर होऊन नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.