🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल


कोल्हापूर : नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला कोल्हापूर जिल्ह्यात वेग आला आहे. आंबा ते शिये फाटा दरम्यानचे काम सध्या गतीने सुरू असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मार्च २०२७ अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.

मात्र, शिये फाटा ते सांगली या मार्गासाठी नवीन ठेकेदाराची नियुक्ती तसेच भूसंपादनातील अडचणी सोडविण्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे या मार्गाच्या कामाबाबत सध्या स्पष्टता नसल्याचे चित्र आहे. नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे कोल्हापूर ते रत्नागिरीदरम्यानचे काम तीन टप्प्यांत सुरू आहे. यामध्ये मिऱ्या बंदर ते आंबा, आंबा ते पैजारवाडी आणि पैजारवाडी ते चोकाक या टप्प्यांचा समावेश आहे. मिऱ्या बंदर ते आंबा या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. आंबा ते पैजारवाडी टप्प्यातील सुमारे ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे, तर पैजारवाडी ते चोकाक टप्प्यात सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. पैजारवाडी ते चोकाक टप्प्याचे काम मेअखेर पूर्ण करण्याचे लक्ष्य होते. मात्र, निर्धारित मुदतीत काम पूर्ण न झाल्याने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, आंबा ते शिये फाटा या भागातील उर्वरित काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे घाटात धोकादायक वळणे आहेत. या वळणांना कायमस्वरूपी पर्याय म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात उंच आणि लांब उड्डाणपूल उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या ठिकाणी सध्या दिवसरात्र काम सुरू असून, ६०० हून अधिक कामगार कार्यरत आहेत. कामासाठी १०० हून अधिक डंपर, ५० पोकलेन, १० मोठे जेसीबी आणि ५०० टनांपर्यंत वजन उचलण्याची क्षमता असणारे क्रेन तैनात करण्यात आले आहेत. अवघड घाट परिसरातील काम तातडीने पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. दरम्यान, आंबा ते शिये फाटा मार्गाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असले तरी शिये फाटा ते सांगली मार्गासाठी नवीन ठेकेदाराची नियुक्ती आणि भूसंपादनाच्या अडचणी दूर होणे आवश्यक आहे. त्यामुळे या पुढील कामाच्या वेळापत्रकाबाबत सध्या स्पष्टता नसल्याचे चित्र आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.