नवी दिल्ली : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार सध्या निवडणूक आयोगातील निर्णयप्रक्रियेवरून चर्चेत आले आहेत. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनादरम्यान घेतलेल्या काही निर्णयांवर निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी आक्षेप घेतल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.
या वृत्तानुसार, गेल्या दहा महिन्यांत अशा निर्णयांवर आणि आदेशांवर दोन्ही निवडणूक आयुक्तांनी किमान १४ वेळा अधिकृत आक्षेप नोंदवला. मात्र, निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित दोन्ही निवडणूक आयुक्तांनी या प्रकरणावर अद्याप सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही.ज्ञानेश कुमार यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये देशाचे २६ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. त्यापूर्वीच्या प्रशासकीय कारकिर्दीत जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० च्या तरतुदी रद्द करण्याची प्रक्रिया आणि राम जन्मभूमी मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याशी संबंधित केंद्र सरकारच्या निर्णयांमध्ये त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.
विरोधकांकडून यापूर्वीही टीका
मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासूनच ज्ञानेश कुमार यांच्यावर विरोधी पक्षांकडून टीका होत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप केल्यानंतर ज्ञानेश कुमार यांनी हे आरोप प्रतिज्ञापत्राद्वारे सिद्ध करावेत किंवा माफी मागावी, असे म्हटले होते. त्यांच्या या भूमिकेवरही विरोधकांनी आक्षेप घेतला होता.
ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीवरही विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते. २०२३ मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी करण्यात आलेल्या कायद्यानुसार स्थापन झालेल्या समितीने ज्ञानेश कुमार यांची निवड केली. या समितीत भारताच्या सरन्यायाधीशांच्या ऐवजी केंद्रीय मंत्रिमंडळातील एका सदस्याचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे तीन सदस्यीय समितीत सरकारचे दोन प्रतिनिधी होते. समितीतील विरोधी पक्षाचे एकमेव सदस्य राहुल गांधी यांनी नियुक्तीची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयातील संबंधित याचिकांवरील निर्णयापर्यंत स्थगित ठेवण्याची मागणी केली होती.
ज्ञानेश कुमार कधी निवृत्त होणार?
ज्ञानेश कुमार यांचा मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यकाळ २६ जानेवारी २०२९ रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यानंतर नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली जाईल. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ सहा वर्षे किंवा वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी येईल, असा असतो.
कलम ३७० आणि राम मंदिर ट्रस्टशी संबंधित काम
केंद्रीय सेवेत येण्यापूर्वी ज्ञानेश कुमार यांनी केरळमध्ये विविध प्रशासकीय पदांवर काम केले. केंद्रीय गृह मंत्रालयात कार्यरत असताना जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० च्या तरतुदी रद्द करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित कामकाजात त्यांची भूमिका होती. तसेच अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन करण्याच्या प्रक्रियेतही त्यांनी जबाबदारी सांभाळली. यानंतर त्यांनी संसदीय कामकाज मंत्रालय आणि सहकार मंत्रालयाचे सचिव म्हणून काम केले. याशिवाय, संरक्षण मंत्रालयात सहसचिव तसेच गृह मंत्रालयात सहसचिव आणि अतिरिक्त सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या.
ज्ञानेश कुमार यांची शैक्षणिक आणि प्रशासकीय कारकीर्द
ज्ञानेश कुमार हे उत्तराखंड केडरचे १९८८ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी कानपूरमधून सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. तसेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट्स ऑफ इंडिया (ICFAI) मधून बिझनेस फायनान्स आणि हार्वर्ड विद्यापीठातून एन्व्हायर्नमेंटल इकॉनॉमिक्सचे शिक्षण घेतले आहे.
सुखबीर सिंह संधू कोण आहेत?
सुखबीर सिंह संधू हे देखील उत्तराखंड केडरचे १९८८ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते मार्च २०२४ मध्ये निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त म्हणून रुजू झाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी आयोगात काम केले. यापूर्वी त्यांनी उत्तराखंडचे मुख्य सचिव, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) अध्यक्ष आणि लोकपालचे सचिव म्हणून काम केले आहे. त्यांचा निवडणूक आयोगातील कार्यकाळ जुलै २०२८ मध्ये संपणार आहे.
ज्ञानेश कुमार यांच्यानंतर कोण होणार CEC?
ज्ञानेश कुमार यांच्या आधी सुखबीर सिंह संधू यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोगातील विद्यमान निवडणूक आयुक्तांपैकी विवेक जोशी यांचे नाव मुख्य निवडणूक आयुक्तपदासाठी पुढे येते. विवेक जोशी हे १९८९ बॅचचे हरियाणा केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी १९ फेब्रुवारी २०२५ रोजी निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. यापूर्वी त्यांनी हरियाणाचे मुख्य सचिव म्हणून काम केले आहे.मात्र, मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती आपोआप होणार नसून, संसदेने मंजूर केलेल्या विद्यमान कायद्यानुसार नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांचा कार्यकाळ संपल्यानंतर अंतिम नियुक्ती केंद्र सरकारच्या कायदेशीर प्रक्रियेनुसार होईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.