मिरज :- आगामी श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष पोलीस बंदोबस्त आणि कडक कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत संवेदनशील व गर्दीच्या ठिकाणी पोलीस पथकांकडून रात्रंदिवस 'अलर्ट' राहून सतर्क पेट्रोलिंग (गस्त) घातली जात आहे. गणेशोत्सव हा नागरिक उत्साहात व शांततेत साजरा करू शकतील यासाठी पोलिसांनी पूर्वतयारी सुरू केली असून संशयित हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. मुख्य चौक, गर्दीचे मार्ग तसेच मिरवणूक मार्गांवर पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.
‘नशामुक्त अभियाना’अंतर्गत गुन्हेगारांवर कडक कारवाई
केवळ गणेशोत्सवाची तयारीच नव्हे, तर शहराला नशामुक्त करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. ‘नशामुक्त अभियान’ अंतर्गत अमली पदार्थांचे सेवन, विक्री व अवैध धंद्यांवर गांधी चौक पोलीस ठाण्याकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अनेक संशयितांची झाडाझडती घेतली जात असून असामाजिक तत्त्वांवर आणि उपद्रवी घटकांवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे.
नागरिकांना सहकार्याचे आवाहन
गणेशोत्सव काळात शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे तत्पर आहे. नागरिकांनी आणि उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे, तसेच कोणताही संशयित प्रकार अथवा अमली पदार्थांसंबंधीची माहिती आढळल्यास तात्काळ गांधी चौक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.