कुरळप : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील श्री क्षेत्र मलिकार्जुन देवस्थानच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या म्हैसाळ येथील १८ वर्षीय तरुणाचा बुधवारी (दि. २) अचानक मृत्यू झाला. विशाल काशिनाथ वाघमोडे (वय १८, रा.म्हैसाळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. ट्रेकिंग करून डोंगरावरील पायऱ्यांवरून खाली येत असताना त्याला अचानक फिट आली आणि तो बेशुद्ध पडला. विशाल हा म्हैसाळ येथील एका अकॅडमीत शिक्षण घेत होता. इतर मित्रांसोबत तो मलिकार्जुन डोंगरावर ट्रेकिंगसाठी आला होता. ट्रेकिंग पूर्ण करून पायऱ्यांवरून खाली येत असतानाच त्याला अचानक त्रास जाणवला.
त्यानंतर तो जागीच बेशुद्ध पडल्याने सोबतच्या मित्रांची धावपळ उडाली. विशालचा मित्र महेश मारुती माळी (रा. म्हैसाळ) याने तत्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था करून त्याला उपचारासाठी ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती डॉ. अभिजित खोत यांनी कुरळप पोलिसांना दिली. त्यानुसार कुरळप पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सपोनि भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार पुढील तपास करीत आहेत.
ट्रेकिंग दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज प्राथमिक माहितीनुसार, ट्रेकिंग दरम्यान विशालला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अवघ्या १८ व्या वर्षी विशालचा अचानक मृत्यू झाल्याने म्हैसाळ परिसरासह त्याच्या मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. घटनेमुळे ट्रेकिंगसाठी आलेल्या तरुणांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.