🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे बदल, प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानंतर निर्णय, पक्षांतर्गत नाराजीनंतर तोडगा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे बदल, प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानंतर निर्णय, पक्षांतर्गत नाराजीनंतर तोडगा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक निर्णय आता एकट्या-दुकट्या नेत्यांऐवजी सामूहिक पद्धतीने घेतले जाणार आहेत. पक्षाच्या कोअर कमिटी आणि विस्तारित कोअर कमिटीच्या नियमित बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्याचे ठरले आहे.

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानुसार पक्षात हे बदल सुरू झाले असून, निर्णयप्रक्रियेत अंतिम शब्द मात्र पवार कुटुंबीयांचाच राहणार असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.


पवार कुटुंबीय विरुद्ध पटेल-तटकरे संघर्षाची शक्यता


अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षातील अलीकडील नेतृत्वबदल आणि पक्षांतर्गत रचनेवरून राष्ट्रवादीत काही प्रमाणात नाराजी होती. कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भूमिकांबाबतही पक्षात चर्चा सुरू होती. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर निवडणूक आयोगाला पाठविण्यात आलेल्या पक्षरचनेत पटेल आणि तटकरे यांच्या पदांचा उल्लेख नसल्याने नव्या वादाला तोंड फुटले. तसेच, पक्षातील काही निर्णयांवर खासदार पार्थ पवार यांचा प्रभाव असल्याचीही चर्चा होती. त्यामुळे पवार कुटुंबीय विरुद्ध पटेल-तटकरे असा अंतर्गत संघर्ष वाढतो की काय, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

सामूहिक निर्णयप्रक्रिया राबवण्याची सूचना

या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन पक्षाच्या पुढील वाटचालीवर चर्चा केली. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीतही त्यांनी उपस्थित राहून पक्षाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केल्याचे समजते. पक्ष सुस्तावला असून त्याला पुन्हा सक्रिय करण्यासाठी विविध सेल आणि विभागांच्या नियमित बैठका घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. महत्त्वाचे म्हणजे, कोणत्याही एका व्यक्तीकडे निर्णय केंद्रीत न ठेवता सामूहिक निर्णयप्रक्रियेला स्थान देण्याची सूचना त्यांनी केली.
राज्यस्तरीय शिबिराची घोषणा

त्याच अनुषंगाने सोमवारी पक्षाच्या विस्तारित कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत राज्यस्तरीय शिबिराची घोषणा करण्यात आली. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी दिलीप वळसे-पाटील, तर 'एसआयआर'शी संबंधित बाबींसाठी नवाब मलिक यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढील आठवड्यात विस्तारित कोअर कमिटीची पुन्हा बैठक होणार असून, त्यात शिबिराचे पुढील नियोजन ठरणार आहे. शिबिरानंतर जिल्हाध्यक्षांसह इतरसंघटनात्मक पदांमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे.

पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, आता संघटनात्मक निर्णय, नियुक्त्या आणि धोरणात्मक भूमिका कोअर कमिटीच्या बैठकीतच निश्चित केल्या जातील. संवाद वाढवून पक्ष चालविण्याचा प्रयत्न आहे. मात्र, सामूहिक निर्णयप्रक्रिया असली तरी अंतिम निर्णय पवार कुटुंबीयांचाच राहील.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.