सांगली :- मार्केट यार्ड परिसरातून तीन वर्षांपूर्वी चोरीला गेलेली दुचाकी विकण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत चोरट्याला सांगली ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने (DB) जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३० हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त केली असून आरोपीला पुढील तपासासाठी विश्रामबाग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सागर अशोक शिंदे (वय ३८, रा. लाल नगर, गल्ली नं. ३, सेवासदन हॉस्पिटलजवळ, मिरज) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
काय आहे नेमकी घटना?
वारणाली येथील रहिवासी सुहास श्रीरंग सावंत (वय ६२) हे १२ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११:३० वाजता मार्केट यार्डातील रामदेव किराणा स्टोअर्ससमोर आपली हीरो कंपनीची 'आय स्मार्ट स्प्लेंडर' (क्र. MH 10 CJ 4582) उभी करून किराणा माल आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने ही दुचाकी लांबवली होती. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३७९ अन्वये गुन्हा (गु.र.नं. १५/२०२१) दाखल करण्यात आला होता.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांचा छापा
जिल्ह्यात घरफोडी व वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिजीत देशमुख व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तपासावर असताना, पोलीस कॉन्स्टेबल आकाश ऐवळे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. सेवासदन हॉस्पिटलजवळील क्रिश्चन स्मशानभूमीजवळ झाडाखाली एक इसम लाल रंगाची संशयित दुचाकी विकण्यासाठी थांबल्याचे समजताच पथकाने तात्काळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
अशी झाली गुन्ह्याची उकल
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दुचाकीच्या आरटीओ नंबर, चेसी नंबर (MBLHA12ACGHD27805) आणि इंजिन नंबर (HA12EMGHD28086) वरून खात्री केली असता, ही गाडी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी सागर शिंदे याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली.
कारवाई करणारे पथक
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी (अतिरिक्त चार्ज) सुहास देशमुख आणि पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासात सहाय्यक पोलीस फौजदार मेघराज रूपनर, पोलीस हेडकॉन्स्टेबल बंडू पवार, अभिजित पाटील आणि विशेष कामगिरी बजावणारे पोलीस कॉन्स्टेबल आकाश ऐवळे (बॅच नं. १३०९) यांचा समावेश होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.