मुंबई :- महाराष्ट्र संपादक परिषदेचे संस्थापक आणि ज्येष्ठ पत्रकार स्व. यशवंत पाध्ये यांच्या विचार आणि कार्याचा वारसा जपण्यासाठी, त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्रातील संपादक व ज्येष्ठ पत्रकारांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र संपादक परिषदेच्या कार्यकारिणी बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय एकमुखाने घेण्यात आला.
शिवाजी पार्क येथील 'होरायझन टॉवर'मध्ये परिषदेचे उपाध्यक्ष सुधीर भाऊ जाधव यांच्या कार्यालयात ही बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी एकनाथ बिरवटकर होते.
सन्मानाचे स्वरूप
विशेष स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र
शाल व श्रीफळ
रोख रक्कम
संपादकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष
स्थानिक व प्रादेशिक वृत्तपत्रांच्या संपादकांना संघटित व्यासपीठ मिळवून देणे, त्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवणे आणि समाजात संपादकांची प्रतिष्ठा जपण्यासाठी स्व. यशवंत पाध्ये यांनी आयुष्यभर काम केले. "संपादक हा केवळ वृत्तपत्राचा व्यवस्थापक नसून लोकमत घडवणारा लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे," ही भूमिका त्यांनी नेहमी मांडली. त्यांच्या याच योगदानाला उजाळा देण्यासाठी आणि नव्या पिढीतील पत्रकारांना प्रेरणा मिळावी म्हणून या सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे.
ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
बैठकीच्या सुरुवातीला परिषदेचे सचिव स्व. अनंत ऊर्फ राजू पाध्ये यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. या बैठकीस परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे, उपाध्यक्ष सुधीर भाऊ जाधव, गजानन चव्हाण, दीपाताई पाध्ये, हेमंत सामंत, राजेंद्र मोहिते, गोरख तावरे, डी. पी. विष्णुपुरीकर, अरुण सुरूडकर यांसह कार्यकारिणीतील इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.