कर्मवीर पतसंस्थेच्या ३९ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अभूतपूर्व गोंधळ; १२% लाभांश व ऑडिटर बदलण्यासाठी सभासद आक्रमक, संचालक मंडळाची फजिती!
सांगली :- सांगलीतील नामांकित ‘कर्मवीर पतसंस्थे’च्या ३९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शुक्रवारी तुफान गोंधळ उडाला. पतसंस्थेच्या गेल्या ३९ वर्षांच्या वाटचालीत असा प्रकार पहिल्यांदाच घडल्याने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सभासदांना केवळ १२ टक्केच लाभांश (डिव्हिडंड) देण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या सभासदांनी संचालक मंडळाला अक्षरशः धारेवर धरले.
सभा सुरू होताच कमी झालेल्या लाभांशाच्या मुद्द्यावरून सभासद प्रचंड आक्रमक झाले. अध्यक्षांच्या आणि संचालक मंडळाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत सभासदांनी थेट "ऑडिटर बदला" अशी जोरदार मागणी लावून धरली. सभासदांच्या या अनपेक्षित आणि आक्रमक पवित्र्यामुळे संचालक मंडळ पुरते खजिल झाले होते.
ऑडिटर शिरीष किर्लोस्कर यांचा डायसवर ठाम पवित्रा
सभासदांचा रोष वाढल्यानंतर पतसंस्थेचे ऑडिटर शिरीष किर्लोस्कर यांनी स्वतः डायसवर येऊन माईक हातात घेतला आणि खरी परिस्थिती स्पष्ट केली. ते म्हणाले, "या प्रकरणात ऑडिटरची कोणतीही चूक नाही, ही पूर्णपणे पतसंस्थेची चूक आहे. संस्थेने कर्ज वसुलीवर अजिबात भर दिला नाही. वसुली न होणे ही ऑडिटरची चूक ठरू शकत नाही. आम्ही सहकार कायद्याच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनच ऑडिट केले आहे. तुम्हाला ऑडिटर नको असेल तर नक्की बदला, आमची काहीही हरकत नाही."
संचालक मंडळ निष्प्रभ, सभा घाईघाईने गुंडाळली
ऑडिटर किर्लोस्कर यांच्या या स्पष्टीकरणानंतर उपस्थित सभासदांनी एकच जल्लोष केला. "ऑडिटरची काहीही चूक नाही, हा संपूर्ण भोंगळ कारभार आणि चूक फक्त आणि फक्त संचालक मंडळाचीच आहे," असा घणाघाती आरोप सभासदांनी केला. सभासदांच्या या तीव्र आक्षेपामुळे संचालक मंडळाकडे कोणतेही उत्तर उरले नव्हते.*सगळ्यात मोठा मुद्दा होता तो म्हणजे फराटे याचे सभासद रद्द करा याविषयी जोरदार आवाज सभासदानी लावून धरला*शेवटी नामुष्की टाळण्यासाठी संचालक मंडळाने सभासदांचे आक्षेप आणि मागण्या लेखी स्वरूपात (कच्चे लिहून) घेतल्या. "यावर संचालक मंडळ एकत्र बसून योग्य तो विचार करेल आणि निर्णय घेईल," असे सांगत संचालकांनी घाईघाईने वार्षिक सभा गुंडाळली. या घटनेमुळे कर्मवीर पतसंस्थेतील अंतर्गत अनागोंदी आणि संचालक मंडळाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.