🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आरोग्य अधिकाऱ्यांना ओपीडी बंधनकारक; साप्ताहिक अहवालही द्यावा लागणार

आरोग्य अधिकाऱ्यांना ओपीडी बंधनकारक; साप्ताहिक अहवालही द्यावा लागणार

पुणे :-आरोग्य यंत्रणेतील जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी तसेच संबंधित वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयीन कामकाजापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष रुग्णसेवेत सहभागी व्हावे, असे निर्देश राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागाने दिले आहेत.

त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांना आता आठवड्यातून किमान तीन तास बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) रुग्णांची तपासणी करावी लागणार आहे.आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यासोबतच रुग्णांना प्रत्यक्ष स्तरावर येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमितपणे रुग्णालयांना भेटी देणे आणि ओपीडीत सेवा देणे अपेक्षित आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रुग्णालयांना भेट दिली किंवा नाही, याची ऑनलाईन नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आली आहे. भेटीदरम्यान आढळलेल्या त्रुटी, त्यावर देण्यात आलेल्या सूचना, संबंधित त्रुटीसाठी जबाबदार अधिकारी तसेच ती त्रुटी दूर करण्यासाठी निश्चित केलेली कालमर्यादा यांची नोंद करावी लागणार आहे.या सर्व बाबींचा समावेश असलेला साप्ताहिक अहवाल तयार करून तो आरोग्य सेवा आयुक्तालयाला सादर करावा लागणार आहे. त्यामुळे वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना कार्यालयीन जबाबदाऱ्यांसोबत प्रत्यक्ष रुग्णसेवेतही सक्रिय सहभाग घ्यावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.