साखरेला गूळ हा पर्याय योग्य की अयोग्य? गूळ खाल्ल्याने HbA1c वाढल्याची धक्कादायक माहिती; डॉक्टरांचा मोठा खुलासा!
साखरेऐवजी गूळ वापरला म्हणजे रक्तातील साखर नियंत्रणात राहते असा अनेकांचा समज असतो. पण, हा समज कितपत योग्य आहे? गूळ नैसर्गिक असला तरी तो शरीरातील रक्तातील साखरेवर परिणाम करू शकतो का?
एका रुग्णाच्या बाबतीत गूळ खाल्ल्यानंतर तीन महिन्यांत HbA1c ७.२ टक्क्यांवरून ८.५ टक्क्यांपर्यंत वाढल्याचं समोर आलं, त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी गुळाकडे साखरेचा सुरक्षित पर्याय म्हणून पाहावं का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. यासाठी नियमित शारीरिक हालचाल, योग्य आहार, कर्बोदकांचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर घेणे आवश्यक असते. विशेषतः गोड पदार्थ आणि अतिरिक्त साखरेचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो.
पण, साखर सोडून त्याऐवजी गूळ वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गूळ नैसर्गिक आहे, त्यावर पांढऱ्या साखरेसारखी प्रक्रिया होत नाही आणि त्यामुळे तो आरोग्यासाठी चांगला असावा असा समज अनेकांच्या मनात असतो. मात्र, मधुमेहाच्या बाबतीत चित्र काहीसं वेगळं असू शकतं.
गूळ खाऊनही रक्तातील साखर का वाढली?
दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयातील अंतःस्रावतज्ज्ञ डॉ. सप्तर्षी भट्टाचार्य यांनी एका ४२ वर्षीय महिलेबाबतचा अनुभव सांगितला. या महिलेला नुकताच प्रकार-२ मधुमेह असल्याचे निदान झाले होते. रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी पांढरी साखर पूर्णपणे आहारातून काढून टाकली आणि तिच्या जागी गुळाचा वापर सुरू केला.
त्यांना गूळ हा नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय वाटत होता, त्यामुळे सकाळच्या चहात गूळ घालणे, स्वयंपाकात गुळाचा वापर करणे आणि दुपारच्या जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा झाली की गुळाचा छोटा तुकडा खाणे असा त्यांचा दिनक्रम होता.
विशेष म्हणजे त्या नियमित चालत होत्या, आहाराची काळजी घेत होत्या आणि मधुमेह नियंत्रणासाठी आवश्यक नियम पाळत होत्या; तरीही रक्तातील साखरेची पातळी कमी होण्याऐवजी वाढत होती.
तीन महिन्यांनंतर तपासणी केली असता त्यांचा HbA1c ७.२ टक्क्यांवरून ८.५ टक्क्यांवर पोहोचला. आहाराचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर दिवसातून अनेक वेळा गूळ खाल्ला जात असल्याचे लक्षात आले.
डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार गुळाचे सेवन बंद केल्यानंतर पुढील तीन महिन्यांत HbA1c ७ टक्क्यांपर्यंत कमी झाला.
HbA1c म्हणजे नेमकं काय?
HbA1c ही मधुमेह समजून घेण्यासाठी केली जाणारी महत्त्वाची रक्तचाचणी आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर या चाचणीमुळे मागील साधारण दोन ते तीन महिन्यांतील रक्तातील साखरेची सरासरी पातळी किती होती याचा अंदाज येतो.
एखाद्या दिवशी रक्तातील साखर कमी किंवा जास्त असू शकते. मात्र, HbA1c त्या दिवसापुरती स्थिती न सांगता काही महिन्यांतील रक्तातील साखरेच्या नियंत्रणाचे व्यापक चित्र दाखवते, त्यामुळे मधुमेह नियंत्रणात आहे की नाही हे तपासण्यासाठी डॉक्टर या चाचणीचा आधार घेतात.
नैसर्गिक गूळ असला तरी मधुमेहात सावधगिरी का?
गूळ ऊसाच्या रसापासून तयार केला जातो. पांढऱ्या साखरेपेक्षा त्याची निर्मिती प्रक्रिया वेगळी असली तरी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर असते, त्यामुळे गूळ म्हणजे साखरेपासून पूर्णपणे वेगळा आणि रक्तातील साखर न वाढवणारा पदार्थ असा समज चुकीचा ठरू शकतो.
गुळाचा वापर चहा, लाडू, चिक्की, तिळगूळ, गुळाचा हलवा किंवा विविध गोड पदार्थांमध्ये केला जातो. नैसर्गिक आहे म्हणून गूळ अधिक प्रमाणात खाण्याची सवय लागली तर एकूण साखरेचे सेवन वाढू शकते. परिणामी रक्तातील साखरेचे नियंत्रण बिघडण्याची शक्यता असते.
डॉ. भट्टाचार्य यांच्या मते, गूळ नैसर्गिक असला तरी मधुमेहाच्या दृष्टीने त्याचा परिणाम साखरेसारखाच होऊ शकतो, त्यामुळे पांढरी साखर बंद करून गूळ अमर्याद प्रमाणात घेणे हा मधुमेह नियंत्रणाचा योग्य मार्ग मानता येणार नाही.
गूळ खाल्ल्याने कोणते धोके वाढू शकतात?
मधुमेहामध्ये रक्तातील साखर दीर्घकाळ वाढलेली राहिल्यास हृदय, मूत्रपिंड, डोळे आणि मज्जातंतू यांसारख्या अवयवांवर परिणाम होण्याचा धोका वाढू शकतो, त्यामुळे केवळ साखर बंद केली म्हणून मधुमेह नियंत्रणात आला असे मानणे योग्य नाही.
आहारात गुळाचा वारंवार आणि जास्त प्रमाणात वापर केल्यास एकूण साखर आणि उष्मांकाचे सेवन वाढू शकते. त्याचा परिणाम वजन, पोटावरील चरबी आणि रक्तातील साखरेच्या नियंत्रणावर होऊ शकतो, त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी गूळ हा साखरेचा पूर्णपणे सुरक्षित पर्याय आहे असे गृहीत धरू नये.
थोडक्यात, नैसर्गिक म्हणजे नेहमीच मधुमेहासाठी सुरक्षित असे नाही. गूळ किती प्रमाणात घ्यायचा, घ्यायचा की नाही आणि आहारात त्याचा समावेश कसा करायचा, हे प्रत्येकाच्या रक्तातील साखरेची पातळी, औषधे, वजन आणि एकूण आरोग्य लक्षात घेऊन डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने ठरवणे अधिक योग्य ठरते.
टीप : ही माहिती डॉक्टरांनी सांगितलेल्या निरीक्षणावर आणि दिलेल्या वैद्यकीय माहितीनुसार आहे. मधुमेहावरील औषधे स्वतःहून बंद किंवा बदलू नयेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.