मुंबई : घसरून पडल्यानंतर महिलेचं चूंबन घेतल्याप्रकरणी मुंबईतील व्यक्तीला न्यायालयाने एक वर्षाच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मागच्या वर्षी बोरिवली (पश्चिम) च्या एका मॉलमध्ये 34 वर्षांचा सफाई कर्मचारी सेल्स वुमनच्या अंगावर घसरून पडला आणि मग त्याने दोन वेळा महिलेचं चुंबन घेतलं. याप्रकरणी कोर्टाने आरोपी रितेश अरमुल्ला याला दोषी मानलं तसंच त्याने स्पष्टपणे चुकीच्या इराद्याने शारीरिक संपर्क केल्याचं न्यायालयाने मान्य केलं.
'एखादी व्यक्ती घसरून दुसऱ्या व्यक्तीच्या अंगावर पडली, तर त्याला स्वाभाविक प्रतिक्रिया मानलं जाऊ शकतं, पण त्या व्यक्तीचं चुंबन घेतलं गेलं असेल तर ती स्वाभाविक प्रतिक्रिया असू शकत नाही', असं न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं आहे. आरोपीने हे कृत्य जाणूनबुजून केल्याचे पुरावे आहेत, असं न्यायाधीश म्हणाले. मुंबईमधील सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
एका वर्षात निकाल
रितेश अरमुल्ला याला न्यायालयाने कलम 74 (कोणत्याही महिलेवर बळाचा वापर करून हल्ला) आणि कलम 75 (लैंगिक शोषण) अंतर्गत दोषी ठरवलं. 'पीडित महिलेने दिलेला जबाब विश्वास ठेवण्यासारखा आहे. पीडित महिला आरोपीच्या विरोधात मुद्दाम जबाब देईल, असं कोणतंही रेकॉर्ड सापडलेलं नाही. तसंच पीडित महिला आरोपीला ओळखत नव्हती, त्यामुळे ती खोटे आरोप करून आरोपीला या प्रकरणात अडकवेल, याचीही शक्यता नाही', असं न्यायाधीश निकाल देताना म्हणाले. आयपीसीच्या ऐवजी बीएनएस लागू झाल्यानंतर खूप कमी प्रकरणांमध्ये आरोप सिद्ध झाले आहेत, यातलं हे प्रकरण आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.