विद्यानंद बापटांच्या समृद्ध मराठीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक; म्हणाले, “मला ट्युशन घ्यावी लागेल!”
पुण्यातील गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक ठिकाणी डीजे आणि लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाला विरोध करताना विद्यानंद बापट यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्दे मांडले आहेत. विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी (३ ऑगस्ट) पुण्यातील टिळक रोड परिसरात हल्ला झाल्याची घटना घडली.
या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडल्यानंतर आता बापट यांच्या समर्थनार्थ आणि 'डीजेमुक्ती'साठी रविवारी पुणे महापालिकेवर मोर्चाही काढण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात आले होते. विद्यानंद बापटांवरील मारहाणीचा निषेध करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “वेगवेगळे विचार असू शकतात, पण हिंसा योग्य नाही. एखादा सण-उत्सव साजरा करताना तो पारंपरिक पद्धतीनेच साजरा करावा.”
मुख्यमंत्र्यांकडून विद्यानंद बापटांच्या मराठीचे कौतुक
पत्रकारांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांना विचारले की, “बापटांच्या मराठीबाबत आपले मत काय आहे?”, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी हसत हसत उत्तर दिले की, “सध्या त्यांची मराठी ट्रेंडिंग आहे. खरोखर ही गोष्ट नक्की आहे की मराठीच्या शुद्धतेचा नमुना त्यांच्या बोलण्यामध्ये पाहायला मिळतो.”
मुख्यमंत्र्यांनी बापटांना दिला ‘हा’ सल्ला
“आता अपेक्षा एवढीच करू की, आपले विचार मांडताना इतरांना त्या विचारांचा फार त्रास होणार नाही. जसे ते त्यांचे विचार शुद्ध मराठीत मांडतात, तसेच त्यांनी ते सर्वसमावेशकपणे मांडावेत, यासाठी मला ट्युशन घ्यावी लागेल,” अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी या वेळी केली. बापटांची भाषा ऐकून आनंद वाटतो, असेही फडणवीस या वेळी म्हणाले.
"पुणे शहराला तुम्ही सांस्कृतिक राजधानी म्हणून मिरवता, 'ही' तुमची संस्कृती आहे का?"
पत्रकार परिषदेत बोलताना बापट म्हणाले, "मी कोण आहे यापेक्षा माझा मुद्दा काय आहे हे अधिक महत्त्वाचे आहे. पुणे शहराला तुम्ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून मिरवता, मग हीच तुमची संस्कृती आहे का?" गणेशोत्सवातील सध्याच्या अव्यवस्थेवर बोट ठेवत त्यांनी प्रशासनाच्या आणि आयोजकांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.