'१४०० कोटींचा निधी रोखला अन् जरांगे भडकले!' वडेट्टीवारांचा सरकारवर सनसनाटी आरोप; पडद्यामागच्या 'त्या' गुप्त समझोत्याचाही केला स्फोट!
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आज उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मनोज जरांगेंनी 90 दिवसांसाठी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच उपोषण स्थगित केलंय, मात्र आंदोलन सुरुच राहणार, असं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं. मनोज जरांगे यांनी सरकारला 90 दिवसांची मुदत दिली आहे.
त्यानंतर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत भाष्य करत टीका केली आहे.मला वाटतं की जरांगे पाटलांचं आंदोलन स्थगित होण्याची काही पहिली वेळ नाही, यापूर्वी सुद्धा मुंबईत जाण्यापूर्वी, मुंबईत जाऊन, सरकार नेहमीच जरांगे पुढे झुकत आहे. एवढ्या शिव्या खाऊनही मला वाटतं की देशातील असं एकमेव सरकार असेल महाराष्ट्रातलं जिथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांपर्यंत सगळ्यांना शिव्या शाप दिल्यावरही शिष्टमंडळ जाऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करतात आणि आंदोलन स्थगित होतं.
यावरून आता या सरकारला शिव्या खायची सवय झाली आहे आणि जरांगे पाटलांच्या शिव्या खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्र सरकारची झालेली आहे. हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र द्या आणि नंतर व्हॅलिडीटी देण्यासाठी स्वतंत्र कायदा तयार करा अशी मागणी आहे, न्यायाच्या चौकटीत हा नियम बसू शकेल किंवा याला किती संवैधानिक मजबुती मिळेल हे येणारा काळ सांगेल पण एवढे मात्र नक्की की, मनोज जरांगे पाटलांनी सरकारच्या मंत्र्यांकडून वाटेल ते लिहून घेतलं, यामध्ये ओबीसींचा प्रचंड वाटोळ होणार आहे आणि हे सरकार ओबीसींचं वाटोळ करणार आहे. मराठा समाजाला देण्यासाठी आम्ही कधी विरोध केला नाही आणि करणारही नाही, मात्र राज्याची तिजोरी रिकामी करून आम्हाला भिकेला लावून द्या, आमच्या 348 जातींपैकी 200 अशा जाती आहेत त्या जातीतील लोकांच्या दरडोई उत्पन्न 2 हजार सुद्धा नाही, अशी परिस्थिती असेल आणि त्यांच्या वाट्याचा त्यांना मिळत असेल, तर आनंद आहे, कोणी ताकद दाखवून सरकार ओबीसींचे वाटोळ करत असेल तर महाराष्ट्रातील ओबीसी जनता या सरकारला माफ करणार नाही, असंही पुढे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
जवळच्यांची चौदाशे कोटींची काम थांबवल्यामुळे जरांगेनी आंदोलन पुकारलं असा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केला आहे. काम रद्द झाल्याच्या रागातून जरांगे बोलत होते का? असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे. सरकार जरांगेना मूर्ख बनवतंय आणि ते बनतात असं देखील वडेटीवार म्हणाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र मूर्खांच्या नंदनवनात वावरतोय असा घणाघात त्यांनी केला आहे. कोण घाबरलं? सरकार घाबरलं की, जरांगे पाटील असा सवाल ही त्यांनी केलेला आहे. जवळपास ईडी चौकशी काही लोकावर सुरू झाली, काही माणसांची काम, जरांगे पाटलांच्या जवळच्या लोकांना चौदाशे कोटींची काम दिली, काही सिंचन इरिगेशन विभागाची काम दिली, त्याला स्थगिती देवेंद्र फडणविसांनी दिली, त्याचा राग कदाचित जरांगे पाटलांना आला का? म्हणून त्यांनी काही फडणविसांना शिव्या देऊन ते मुंबईच्या दिशेने निघाले का? हे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात आणि म्हणून मला तरी असं वाटतं हे आंदोलन सरकार आणि जरांगे पाटलांचा समझोता आहे, निर्णय नाही, ते एकमेकांंनी घाबरलेत आणि एकमेकांना घाबरून दोघांनी केलेला हा समझोता आहे, असंही पुढे विजय वडेट्टीवारांनी म्हटलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.