🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडक कारवाई: गाड्यांवर बोगस 'आमदार' स्टिकर लावाल तर ड्रायव्हिंग लायसन्स थेट रद्द!

पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडक कारवाई: गाड्यांवर बोगस 'आमदार' स्टिकर लावाल तर ड्रायव्हिंग लायसन्स थेट रद्द!


पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात मोटारीवर बेकायदेशीरपणे ‘महाराष्ट्र विधानसभा सदस्य-आमदार’ असा लोगो लावून फिरणाऱ्या वाहन चालक, मालकांवर गुन्हे दाखल केल्यानंतर आता पोलिसांनी संबंधितांचा वाहन परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याबाबतचे प्रस्ताव परिवहन विभागाकडे पाठविण्यात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात आमदार असा लोगो असलेल्या मोटारी पोलिसांना आढळून आल्या आहेत. स्वतः किंवा कुटुंबात कोणीही आमदार नसताना फसव्या उद्देशाने हा लोगो लावला जात असल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले. वाहनांवर ‘महाराष्ट्र विधानसभा सदस्य-आमदार’ आणि अशोकस्तंभाचा लोगो अनधिकृतरित्या वापर करणाऱ्या वाहन चालक, मालकांविरोधात मागील आठवड्यात मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे दाखल केले आहेत. आता संबंधितांचा वाहन परवाना निलंबनाचे प्रस्तावही नियमानुसार पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांकडून ६४ कोटींचा दंड वसूल

विनाहेल्मेट, आकर्षक नंबर प्लेट, काळी काच, सायलेंसरमध्ये बदल आणि वाहन परवाना निलंबनासंबंधी अशा पाच लाख ७२ हजार १८ वाहनांवर जानेवारीपासून आत्तापर्यंत कारवाई केली आहे. या वाहन चालकांकडून ६३ कोटी ७८ लाख ४७ हजार ६५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. दंडात्मक, न्यायालयीन कारवाई टाळावी. वाहतूक कोंडी, वाहतूक नियमन, वाहतूकविषकय समस्या कळविण्यासाठी ट्राफिक बडी व्हॉट्सअॅप चॅटबॉटचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये तोतया आमदारांचा सुळसुळाट, मोटारीवर 'आमदार' लोगो लावणाऱ्या दोघांवर गुन्हा
मोटारीवर बेकायदेशीरपणे 'महाराष्ट्र विधानसभा सदस्य - आमदार' असा लोगो लावून फिरणाऱ्या दोघांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला. ही कारवाई कस्‍पटेवस्‍ती, वाकड येथे गुरुवारी करण्यात आली. याबाबत सांगवी वाहतूक विभागातील पोलीस शिपाई सुधीर कैलास साबळे यांनी वाकड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिंपळेसौदागर आणि भोसरीतील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कस्पटे वस्ती येथील एका हॉटेलसमोर काळ्या काचा असलेली मोटार तपासणीदरम्यान आढळली. मोटारीवर पांढऱ्या-हिरव्या रंगाचा अशोक स्तंभासह बनावट 'आमदार' असा लोगो लावलेला होता. स्वतः किंवा कुटुंबात कोणीही आमदार नसताना फसव्या उद्देशाने हा लोगो लावल्याचे निष्पन्न झाले. वाकड पोलीस करित आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.