सांगली जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर; ट्रिगर-१ लागू झालेल्या चार तालुक्यांतील शेतकऱ्यांना सर्व सवलती व मदतीचा लाभ तात्काळ पोहोचवा:-
— पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रशासनाला निर्देश
सांगली :-खरीप हंगाम २०२६ मधील पावसाची तूट आणि निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, कृषी आयुक्तांच्या अहवालानुसार राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’ (प्रथम कळ) लागू करण्यात आला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील मिरज, आटपाडी, जत आणि कवठेमहांकाळ या चार तालुक्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या सर्व सवलती व उपाययोजनांचा लाभ थेट शेतकरी आणि नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तत्परतेने कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
उर्वरित तालुक्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार
प्रथमतः जिल्ह्यातील चार तालुक्यांचा ट्रिगर-१ मध्ये समावेश झाला असला तरी, जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांचाही पुढील टप्प्यात यात समावेश व्हावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने आणि पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
‘बळीराजाने घाबरू नये, शासन खंबीरपणे पाठीशी’
दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजाने खचून किंवा घाबरून जाऊ नये, असे आवाहनात्मक प्रतिपादन करताना पालकमंत्री म्हणाले की, "राज्य शासन पूर्णपणे संवेदनशील असून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. गेल्या आठवड्यातच मी यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला आवश्यक ते निर्देश दिले आहेत."
पाणी आणि चाऱ्याला सर्वोच्च प्राधान्य
नागरिकांना पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यांत ट्रिगर-१ लागू झाल्याने शासकीय नियमानुसार मिळणाऱ्या सर्व सवलती, करमाफी व मदतीच्या उपाययोजना अंमलात आणण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत विनाविलंब पोहोचावा यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी पूर्ण तत्परतेने काम करावे, असे निर्देशही त्यांनी शेवटी दिले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.