कर्मवीर पतसंस्थेतील मतभेद मिटले: अध्यक्ष व उपाध्यक्षांनी राजीनामे घेतले मागे; सर्व ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित असल्याचा संचालक मंडळाचा ग्वाही संदेश
विशिष्ट तात्विक मतभेदांमुळे चर्चेत आलेल्या कर्मवीर पतसंस्थेतील वाद आता पूर्णपणे मिटला असून संस्थेचे कामकाज पुन्हा एकदा सुरळीत व एकदिलाने सुरू झाले आहे. पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट एस. पी. मगदूम यांनी आपले राजीनामे मागे घेतले असून, संस्थेच्या उत्कर्षासाठी सर्व आजी-माजी संचालक एकत्र आल्याची माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
राजीनामे मागे, कामकाज पुन्हा पूर्ववत
गेल्या काही दिवसांपासून कर्मवीर पतसंस्थेच्या संचालक मंडळात तात्विक मतभेद निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष व उपाध्यक्षांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. मात्र, संस्थेचे हित लक्षात घेऊन विद्यमान चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे, माजी चेअरमन रावसाहेब जिनगोंडा पाटील व सर्व आजी-माजी संचालकांनी एकत्र बसून सकारात्मक चर्चा केली. या बैठकीत सर्व मतभेद यशस्वीरीत्या मिटवण्यात आले. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या अधिकृत बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षांनी आपले राजीनामे मागे घेत संस्थेच्या पुढील कामकाजाची सूत्रे हाती घेतली आहेत.
३८ वर्षांची विश्वासाची परंपरा कायम राहणार
कर्मवीर पतसंस्था गेली ३८ वर्षे अत्यंत पारदर्शकतेने आणि एकदिलाने काम करत आहे. यापुढेही सर्व सभासद, ठेवीदार आणि कर्जदारांच्या सहकार्याने संस्थेला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचे अभिवचन सर्व संचालक मंडळाने दिले आहे.
ठेवीदारांनी काळजी करू नये; ठेवी ५००% सुरक्षित
संस्थेतील घडामोडींमुळे ठेवीदारांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु संचालक मंडळाने सर्व ठेवीदारांना आश्वस्त केले आहे की, "संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असून सर्व ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहेत. कोणत्याही ठेवीदाराने किंवा सभासदाने कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अथवा काळजी करू नये." सर्व सभासद, ठेवीदार आणि कर्जदारांनी या बदलांची नोंद घ्यावी आणि संस्थेवरील आपला विश्वास असाच कायम ठेवावा, असे आवाहन चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे, माजी चेअरमन रावसाहेब जिनगोंडा पाटील व संपूर्ण संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.