🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गोपीचंद पडळकरांची सांगली जिल्हा बँकेवर धडक; अर्ज भरताना 'जयंत पाटलांचा बाप आला'च्या घोषणांनी परिसर दुमदुमला!

गोपीचंद पडळकरांची सांगली जिल्हा बँकेवर धडक; अर्ज भरताना 'जयंत पाटलांचा बाप आला'च्या घोषणांनी परिसर दुमदुमला!

गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

पडळकर यांनी आज (ता.३०) बुधवारी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर जयंत पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांच्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या गटाकडूनही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. पडळकर यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला.

पडळकर यांचा अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात काही काळ गदारोळ झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याविरोधात कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. 'जयंत पाटलांचा बाप आला...' अशा घोषणांमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी पडळकर म्हणाले, "ही शेतकऱ्यांची बँक आहे. या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कल्याण व्हावे, ही आमची भावना आहे. शेतकऱ्यांचा पाठिंबा घेऊनच मी उमेदवारी अर्ज दाखल करत आहे." सदाभाऊ खोत यांच्यासह आणखी काही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका खासदार विशाल पाटील यांनी मांडली आहे. मात्र, त्याचवेळी त्यांनी आणि त्यांच्या पत्नी पूजा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसचे आमदार आणि माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनीही प्रथमच जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सांगली जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होणार की राजकीय संघर्षाची रंगत वाढणार, याकडे लक्ष लागले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.