🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली दर्पण इफेक्ट!​सरकारी डॉक्टरांची अकार्यक्षमता झाकण्याचा प्रशासकीय ‘कांगावा’; गोरगरीब रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या ‘त्या’ लॅब असिस्टंटला कोणाचा पाठिंबा?​

सांगली दर्पण इफेक्ट! सरकारी डॉक्टरांची अकार्यक्षमता झाकण्याचा प्रशासकीय ‘कांगावा’; गोरगरीब रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या ‘त्या’ लॅब असिस्टंटला कोणाचा पाठिंबा?


सांगली :- पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) अनागोंदी कारभारावर ‘सांगली दर्पण’ने प्रकाश टाकताच रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. मात्र, मूळ रोगावर इलाज करण्याऐवजी प्रशासनाने अत्यंत केविलवाणा आणि जबाबदारी झटकणारा ‘लिपापोटी’चा कारभार सुरू केला आहे. रुग्णालयात अत्यावश्यक प्रयोगशाळा तपासण्या का उपलब्ध नाहीत? या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी आणि बाहेर नमुने पाठवणाऱ्या दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचे सोडून, प्रशासनाने एक कागदी परिपत्रक काढून स्वतःची कातडी वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.

​प्रशासनाचा जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न
​नुकत्याच काढलेल्या परिपत्रकात खाजगी प्रयोगशाळांमध्ये पाठवलेल्या नमुन्यांची सर्व जबाबदारी संबंधित डॉक्टरांवर निश्चित करून प्रशासनाने आपल्या अंगावरील जबाबदारी झटकून टाकली आहे. हा मूळ प्रकरणाला बगल देण्याचाच प्रकार असून, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या मोफत सुविधांपासून गोरगरीब रुग्णांना वंचित ठेवण्याचा हा डाव उघड झाला आहे.
​‘त्या’ लॅब असिस्टंटला अभय कोणाचे?

​यापूर्वी याच प्रयोगशाळा तपासण्यांशी संबंधित गोंधळ आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारींवरून दोन जणांची तातडीने जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली होती. मग याच प्रकरणातील मुख्य केंद्रबिंदू असलेल्या 'त्या' विशिष्ट प्रयोगशाळा सहायकाची (लॅब असिस्टंट) बदली का झाली नाही? त्याला वाचवण्यासाठी कोणती अदृश्य शक्ती काम करत आहे? या मागे नक्की कोणते 'गौडबंगाल' आहे, असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी जोर धरत आहे.

​गोरगरीब रुग्णांचा तळतळाट भोवणार!
​शासकीय रुग्णालयात आवश्यक असलेल्या तपासण्या जाणूनबुजून बंद ठेवण्यामागे खाजगी लॅब चालकांशी असलेले अर्थपूर्ण साटेलोटे आहे का? यात कोण-कोण बडे अधिकारी आणि कर्मचारी सामील आहेत? या सर्वांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

​प्रशासनाने एक गोष्ट लक्षात ठेवावी—दारोदारी भटकणाऱ्या गोरगरीब रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या तळतळाटात प्रचंड ताकद असते. यापूर्वी याच तळतळाटामुळे भल्याभल्या सत्ताधाऱ्यांना आपली पदे सोडावी लागली आहेत.

​प्रशासनाने हा कागदी घोडे नाचवण्याचा धंदा तात्काळ बंद करून, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि रुग्णालयातील सर्व तपासण्या पूर्ववत सुरू कराव्यात, अन्यथा 'सांगली दर्पण' याविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेईल!
क्रमश.......



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.