भारतामधील 180 हून अधिक पर्यावरण आणि हवामान वैज्ञानिकांनी आगामी अतिशय शक्तिशाली अल-नीनोच्या शक्यतेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. वैज्ञानिकांच्या मते 2026-27 मधील अल-नीनो सामान्य वर्षांच्या तुलनेत अधिक प्रभावशाली ठरू शकतो. त्याचा भारतातील जंगल, नद्या, समुद्र, पर्वतीय प्रदेश आणि वन्यजीवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर वैज्ञानिकांनी सरकार, संशोधन संस्था आणि संशोधनासाठी निधी देणाऱ्या संस्थांना तातडीने तयारी सुरू करण्याचे आवाहन केले आहे. नुकसान झाल्यानंतर त्याचा अभ्यास करण्याऐवजी आतापासूनच पर्यावरणीय बदलांचे निरीक्षण, नोंद आणि वैज्ञानिक पद्धतीने दस्तऐवजीकरण करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा अभ्यास 16 सप्टेंबर 2026 रोजी Zenodo प्लॅटफॉर्मवर 'सुपर अल-नीनोची दस्तक: 2026/27 मध्ये ईकोलॉजिस्टसाठी इशारा आणि आव्हान' या नावाने प्रकाशित करण्यात आला आहे.
अल-नीनो म्हणजे काय?
अल-नीनो ही प्रशांत महासागराशी संबंधित एक नैसर्गिक हवामान घटना आहे. या घटनेमध्ये समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान सामान्यपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढते. प्रशांत महासागरातील या तापमानवाढीचा परिणाम जगातील अनेक भागांतील हवामानावर होतो.भारतामध्ये अल-नीनोचा संबंध सामान्यतः कमकुवत किंवा उशिरा येणारा मान्सून आणि अधिक उष्ण हवामानाशी जोडला जातो. मात्र प्रत्येक अल-नीनोचा परिणाम सारखाच असेल असे नाही. त्याची तीव्रता, कालावधी आणि त्यावेळची इतर हवामानविषयक परिस्थिती यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो.वैज्ञानिकांच्या म्हणण्यांनुसार यावेळी प्रशांत महासागरातील समुद्राच्या तापमानात असामान्य वाढ होत आहे. त्यामुळे आगामी काही महिन्यांवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे. ही परिस्थिती सामान्य अल-नीनोच्या वर्षांपेक्षा वेगळी ठरू शकते. त्यामुळे त्याचे परिणाम समजून घेण्यासाठी आणि त्यांची वैज्ञानिक नोंद ठेवण्यासाठी आत्तापासून मोठ्या प्रमाणावर निरीक्षण आवश्यक असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
उष्णता आणि दुष्काळाचा धोका वाढण्याची शक्यता
वैज्ञानिकांना अशी भीती आहे की नोव्हेंबर 2026 पासून पुढील वर्षभरात भारतातील अनेक भागांमध्ये सामान्यपेक्षा अधिक उष्ण आणि कोरडे हवामान पाहायला मिळू शकते. पावसाचे प्रमाण कमी झाल्यास पाण्याची टंचाई वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम शेती, जंगल आणि पशुपालनावर होऊ शकतो.
ज्या भागांमध्ये आधीपासूनच पाण्याची कमतरता आहे; त्या प्रदेशांना अशा परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसू शकतो. वाळवंटी प्रदेश तसेच उंच पर्वतीय भागांमध्ये राहणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांसाठीही अशी परिस्थिती अधिक आव्हानात्मक ठरू शकते.
पाण्याच्या स्रोतांवर दबाव वाढल्यास केवळ शेतीचे उत्पादन प्रभावित होणार नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. शेतकरी आणि पशुपालकांसमोर पाणी आणि चाऱ्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
शहरांमध्येही उष्णतेचा परिणाम
अल-नीनोचा परिणाम केवळ ग्रामीण किंवा नैसर्गिक भागांपुरता मर्यादित राहणार नाही. शहरांमध्येही उष्णतेचा प्रभाव वाढू शकतो. काँक्रीटच्या इमारती, रस्ते आणि इतर बांधकामांमुळे शहरी भाग आसपासच्या ग्रामीण भागांच्या तुलनेत आधीच अधिक उष्ण असतात. अशा परिस्थितीत दीर्घकाळ टिकणारी तीव्र उष्णता नागरिकांच्या आरोग्यासोबतच शहरांमधील झाडे आणि वनस्पतींसाठीही मोठे आव्हान ठरू शकते.
जंगलांमध्ये आगीचा धोका वाढू शकतो
सततची उष्णता आणि पाण्याची कमतरता यामुळे जंगलांमध्ये वनवणव्यांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. कोरडी झालेली जंगले सहज पेट घेऊ शकतात आणि आग मोठ्या क्षेत्रात वेगाने पसरू शकते. यामुळे झाडे आणि वनस्पतींसोबत पक्षी तसेच इतर वन्यजीवांनाही मोठे नुकसान होऊ शकते. हवामानातील अचानक बदलांमुळे प्राण्यांच्या अन्नाच्या उपलब्धतेवर, प्रजनन चक्रावर आणि त्यांच्या अधिवासावरही परिणाम होऊ शकतो.
यामुळे जंगलांमधील विविध प्रजातींमधील संतुलन बदलण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम संपूर्ण अन्नसाखळीवर होऊ शकतो. वैज्ञानिकांच्या मते वेळेत निरीक्षण वाढवले नाही तर अशा बदलांचा योग्य पद्धतीने अभ्यास करणे आणि त्यांची नोंद ठेवणे भविष्यात कठीण होऊ शकते.
समुद्रातही वाढू शकते समस्या
अल-नीनोचा प्रभाव केवळ जमिनीवरील परिसंस्थांवर होणार नाही. भारताच्या आसपासच्या समुद्री भागांमध्येही समुद्राच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे समुद्री उष्णतेची लाट म्हणजेच Marine Heatwave निर्माण होऊ शकते. समुद्राचे पाणी असामान्यरीत्या गरम झाल्यास प्रवाल भित्तींमध्ये (Coral Reefs) मोठ्या प्रमाणावर ब्लीचिंग होऊ शकते. त्यामुळे प्रवाल कमकुवत होऊन मृत होण्याचा धोका वाढतो.समुद्राच्या तापमानातील बदलामुळे माशांचे अधिवास आणि अन्न शोधण्याची ठिकाणेही बदलू शकतात. याचा थेट परिणाम मच्छीमारांच्या उत्पन्नावर होऊ शकतो. मासेमारीवर अवलंबून असलेल्या किनारपट्टीवरील समुदायांना त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे जशी जमिनीवरील परिसंस्थांची अभ्यासाची आवश्यक आहे. तशीच समुद्री परिसंस्थेचीही सातत्याने देखरेख करणे आवश्यक असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
माणसांवरही परिणाम होण्याची शक्यता
नैसर्गिक वातावरणातील बदलांचा अंतिम परिणाम सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतो. शेतकरी, मच्छीमार आणि पशुपालक मोठ्या प्रमाणावर हवामानावर अवलंबून असतात. कमी पाऊस आणि वाढलेली उष्णता यामुळे शेती प्रभावित होऊ शकते.
पर्वतीय भागांमध्ये गवताची उपलब्धता कमी झाल्यास पशुपालकांसमोर जनावरांसाठी चाऱ्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्याचप्रमाणे पाण्याची कमतरता आणि वाढते तापमान यामुळे ग्रामीण भागातील उपजीविकेवरही परिणाम होऊ शकतो.
आधीच तयारी करण्याची मागणी
वैज्ञानिकांनी यावेळी नुकसान झाल्यानंतर अभ्यास करण्यापेक्षा आधीपासूनच तयारी करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी जुने संशोधन आणि दीर्घकाळापासून सुरू असलेल्या पर्यावरणीय अभ्यासांना सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
स्थानिक पातळीवर लहान हवामान केंद्रे उभारणे, तापमान आणि आर्द्रतेची नियमित नोंद ठेवणे तसेच विविध राज्ये आणि प्रदेशांमधील वैज्ञानिकांमध्ये सहकार्य वाढवणे, अशी मागणी करण्यात आली आहे.जुन्या उपग्रहांच्या आकडेवारीचा वापर करून सामान्य परिस्थितीत विविध परिसंस्था कशा प्रकारे कार्य करतात याचा अभ्यास करता येऊ शकतो. त्याच्या आधारे अल-नीनोदरम्यान होणारे बदल अधिक अचूकपणे समजून घेण्यास मदत होऊ शकते.
वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, जर वेळेत संशोधन पथके प्रत्यक्ष क्षेत्रात पोहोचली नाहीत तर या असामान्य हवामानाच्या काळात होणारे अनेक महत्त्वाचे बदल कायमस्वरूपी नोंदवले जाण्यापासून वंचित राहू शकतात.
अल-नीनो रोखता येणार नाही
अल-नीनोसारखी नैसर्गिक हवामान घटना रोखता येत नाही. मात्र त्याच्या संभाव्य परिणामांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यातून मिळणारी वैज्ञानिक माहिती जतन करण्यासाठी आत्तापासून तयारी करता येऊ शकते.आगामी काही महिने भारतातील पर्यावरण आणि हवामान संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकतात. वेळेत निरीक्षण आणि संशोधनाला प्राधान्य दिल्यास संभाव्य पर्यावरणीय बदल समजून घेण्यास मदत होईल. तसेच भविष्यातील हवामानविषयक आव्हानांसाठी अधिक चांगल्या पद्धतीने तयारी करण्यासाठीही या संशोधनाचा उपयोग होऊ शकतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.