जत तालुक्यात वयोवृद्ध महिलेवर हल्ला करून दागिने लुटणारे दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ३.३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सांगली:- एकट्या राहणाऱ्या ७० वर्षीय वृद्ध महिलेला जबर दुखापत करून, तिचा कान तोडून अंगांवरील दागिने लुटणाऱ्या दोन अट्टल दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. जत तालुक्यातील बेळुंखी येथील या आरोपींकडून चोरीचे सोने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ३ लाख ३७ हजार ७६२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदाशिव म्हाळाप्पा अनुसे (वय ३१) आणि धनाजी राजु खोबरे (वय १९, दोघे रा. बेळुंखी, ता. जत, जि. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
नेमकी घटना काय?
गत १२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास वाषाण ते बेळुंखी रोडवरील माळी वस्तीवर ७० वर्षीय तानुबाई दाजी शेळके या घरी एकट्याच होत्या. आरोपींनी मोटारसायकलवरून येत घरात घुसून आजींचे हात कापडाने बांधले. त्यांनी जबरदस्तीने कानातील व गळ्यातील दागिने हिसकावून घेतले. या झटापटीत आजींचा कान तुटून त्या गंभीर जखमी झाल्या. लुटारू घटनास्थळावरून पसार झाले होते. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०९ (६), ३५१(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक पुरावा नसताना पोलिसांचे आव्हान
घटना ग्रामीण भागातील वस्तीवर घडल्याने घटनास्थळी कोणताही तांत्रिक पुरावा किंवा सीसीटीव्ही उपलब्ध नव्हते. तसेच पीडित महिला वयोवृद्ध असल्याने आरोपींची माहिती मिळवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले.
एमआयडीसी परिसरात घातला जाळे
पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांचे पथक तपासावर असताना, ५ सप्टेंबर रोजी अंमलदार केरुबा चव्हाण यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली. जत एमआयडीसी परिसरातील जायका हॉटेलसमोर दोघे जण चोरीचे सोने विकण्यासाठी येणार असल्याचे समजले.
पोलिसांनी तत्काळ सापळा रचून काळ्या रंगाच्या सीडी डिलक्स (MH 10 AU 2256) मोटारसायकलसह थांबलेल्या सदाशिव अनुसे आणि धनाजी खोबरे यांना ताब्यात घेतले. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत त्यांच्याकडे २,८७,७६२ रुपये किमतीचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (बोरमाळ, टिक, कर्णफुले, वेल, बुगडी व हुजरं) सापडले.
गुन्ह्याची कबुली
पोलिसांनी कसून चौकशी केली असता, २० दिवसांपूर्वी वाषाण-बेळुंखी रोडवर आजींना मारहाण करून दागिने लुटल्याची कबुली दोन्ही आरोपींनी दिली. पोलिसांनी सोन्याचे दागिने आणि ५० हजारांची मोटारसायकल जप्त करून दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी जत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.ही कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सपोनि प्रशांत निशाणदार, राजेंद्र यादव, पीएसआय महादेव पोवार, केरुबा चव्हाण, विजय पाटणकर (सायबर) व एलसीबीच्या कर्मचाऱ्यांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.