🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दिल्लीमध्ये मोठी दुर्घटना! तीन मजली इमारत कोसळली; अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती, बचावकार्य सुरू

दिल्लीमध्ये मोठी दुर्घटना! तीन मजली इमारत कोसळली; अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती, बचावकार्य सुरू


दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात रविवारी तीन मजली इमारत अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाची अनेक वाहने घटनास्थळी दाखल झाली असून, युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

मोती बाग परिसरातील सत्य निकेतन येथे शिव मंदिराजवळ दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारत कोसळल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. ढिगारा हटवण्यासाठी स्थानिक नागरिकही मदत करत असून, हातोड्यांच्या साहाय्याने मलबा बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत काही वाहनेही ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याचे समोर आले आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, या इमारतीमध्ये वसतिगृह असल्याची माहिती आहे. 

त्यामुळे ढिगाऱ्याखाली काही मुले अडकली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आत नेमके किती जण अडकले आहेत, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने दुर्घटनास्थळाच्या आसपासच्या इतर इमारतीही रिकाम्या करण्यात आल्या आहेत. घटनास्थळावरील छायाचित्रांमध्ये स्थानिक नागरिक बचावकार्यात सहभागी होताना दिसत आहेत. बचाव पथकांनी ढिगाऱ्याखालून दोन तरुणांना सुखरूप बाहेर काढल्याची माहिती आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.