तक्रारदाराने घरी जाऊन नोटीस देणं कायद्यात बसतं का? 'मातोश्री'वरील नाट्यानंतर असीम सरोदे म्हणाले, 'आदित्य ठाकरेंवर एक...', ''दिशा' चुकविली जातेय कारण...'
दिशा सालियन प्रकरण आता थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं निवासस्थानाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलं आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी शनिवारी आदित्य ठाकरेंना त्यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी जाऊन 500 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस दिली आहे.
सतीश सालियन स्वत: आपल्या वकिलांसोबत नोटीस देण्यासाठी गेल्याने शनिवारी 'मातोश्री'जवळ नाट्यमय आणि तणावपूर्ण घडामोडी पाहायला मिळाल्या. या प्रकरणामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव आल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देताना या प्रकरणात आपलं नाव गोवलं जात असून राजकीय हेतूने प्रेरित आरोप केले जात असल्याचं म्हटलं होतं. मात्र आपल्या तक्रारीला राजकीय हेतूने प्रेरित म्हणून आदित्य ठाकरेंनी आपली मानहानी केल्याचा आरोप करत सतीश सालियन यांनी आदित्य यांना नोटीस पाठवली आहे. आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी 'मातोश्री'वर ही नोटीस स्वीकारली. मात्र अशाप्रकारे एखाद्या घरी जाऊन तक्रारदाराने त्याला नोटीस देणं कायदेशीर आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याच प्रश्नाचं उत्तर कायदेतज्ञ आणि वकील असीम सरोदेंनी दिलं आहे.
काय म्हणाले असीम सरोदे?
'मातोश्री' बाहेरील नाट्यानंतर अनेकांनी असीम सरोदेंना अशाप्रकारे घरी जाऊन नोटीस देण्यासंदर्भातील कायदेशीर तरतूद काय म्हणते याबद्दल जाणून घेतल्याचं स्वत: सरोदेंनी सांगितलं आहे. असीम सरोदेंनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. "एखाद्या प्रकरणाची नोटीस द्यायला एखादी व्यक्ती स्वतः वकिलांचा फौजफाटा घेऊन कुणाच्या घरी जाते याला काही कायदेशीर आधार आहे का असा प्रश्न अनेकांना पडला," असं सरोदेंनी पोस्टच्या सुरुवातीला म्हटलं आहे. "महाराष्ट्रातून अनेकजण मला फोनकॉल करून असा प्रश्न विचारीत असल्याने कायदेशीर माहिती देणे आवश्यक आहे," असं म्हणत सरोदेंनी यासंदर्भात खुलासा केला आहे. "क्रिमिनलकेस मध्ये प्रत्यक्ष कुणाच्या घरी जाऊन नोटीस सर्व्हिस करण्याची प्रक्रिया नाही. अपवादत्मक परिस्थितीत केवळ न्यायालयाच्या परवानगीने तसे करता येते. सिव्हिल कायदा प्रक्रियेत रूल 9 अ नुसार तशी दस्ती समन्स प्रक्रिया न्यायालयाचा आदेश झाल्यावर उपलब्ध आहे," असं सरोदेंनी म्हटलं आहे.
घरी जाऊन नोटीस देणाऱ्यांना टोला
सरोदे यांनी नोटीस देणाऱ्यांना म्हणजेच दिशाचे वडील आणि त्यांच्या वकिलांना टोला लगावला आहे. "याप्रकरणी 'मातोश्री'वर नोटीस घेऊन जाणाऱ्यांना कायदा आदित्य ठाकरेंवर एक हत्यार म्हणून वापरायचे आहे खरे तर कायदा हे 'साधन' म्हणून वापरायचे असते. 'दिशा' चुकविली जातेय कारण 'हंगामा खडा करना यही मकसद है!'" असं सरोदेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सात दिवसांची मुदत
दिशाचे वडील सतीश सालियन यांनी पुढील सात दिवसांमध्ये आदित्य ठाकरेंनी नोटीसला उत्तर द्यावं आणि त्यामधील मागण्या पूर्ण कराव्यात असं नोटीसमध्ये नमूद केल्याचे समजते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.