🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोठी घडामोड: ज्ञानेश कुमारांविरुद्ध मित्रांचीच आघाडी! स्वकीयांच्या विरोधामुळे भाजप बॅकफूटवर?

मोठी घडामोड: ज्ञानेश कुमारांविरुद्ध मित्रांचीच आघाडी! स्वकीयांच्या विरोधामुळे भाजप बॅकफूटवर?


केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपल्या दोन सहकाऱ्यांचे मत विचारात न घेता मनमानी पद्धतीने कारभार केल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विरोधकांच्या इंडिया आघाडीतील नेत्यांनी हाच धागा पकडून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून भाजपावर मतचोरीचे आरोप केले. त्यातच आता केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील काही घटकपक्षांनीही निवडणूक आयोगाला जाब विचारण्यास सुरुवात केल्याने ज्ञानेश कुमार यांची चोहोबाजूंनी कोंडी झाल्याचे दिसून येते.

लोक जनशक्ती पार्टीने काय भूमिका मांडली?

निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांवर ज्ञानेश कुमार यांनी तातडीने स्पष्टीकरण द्यावे आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करावा, अशी आग्रही मागणी भाजपाच्या मित्रपक्षांनी शुक्रवारी केली. आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पार्टी, बिहारमधील लोक जनशक्ती पार्टी आणि राष्ट्रीय लोक मोर्चा या पक्षातील प्रमुख नेत्यांनी याबाबत आपापली भूमिका मांडली. निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत असतील, तर मुख्य निवडणूक आयुक्तांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडायला हवी. लोकांनी निवडणूक प्रक्रियेवरच शंका घेण्यास सुरुवात करणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे, असे केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख चिराग पासवान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच निवडणूक आयोगाने आपली बाजू राहुल गांधी यांच्यासमोर मांडण्यापेक्षा ती थेट जनतेसमोर मांडली पाहिजे. जनतेच्या मनातील सर्व शंका आणि गैरसमज दूर करणे आयोगासाठी अत्यंत गरजेचे आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.

तेलगू देसम पार्टीकडून स्पष्टीकरणाची मागणी
तेलगू देसम पार्टीचे लोकसभेतील गटनेते लावू श्रीकृष्ण देवरायालू यांनी आंध्र प्रदेशातील मतदार याद्यांची विशेष सखोल तपासणी अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडल्याचे माध्यमांना सांगितले. त्याचवेळी निवडणूक आयोगाने या सर्व प्रकरणावर तातडीने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था असून आपल्या लोकशाहीत तिच्यावर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आयोगाच्या कामकाजावर कोणीही प्रश्न उपस्थित केल्यास त्यावर तत्काळ स्पष्टीकरण देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कामाजातील पारदर्शकता आणि या घटनात्मक संस्थेवरील जनतेचा विश्वास दृढ होण्यास मदत होईल, असे मतही देवरायालू यांनी व्यक्त केले.
उपेंद्र कुशवाह यांनाही निवडणूक आयोगावर शंका

दुसरीकडे राष्ट्रीय लोक मोर्चाचे प्रमुख आणि राज्यसभा खासदार उपेंद्र कुशवाह यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. आतापर्यंत समोर आलेल्या बाबींवरून आयोगाच्या कामकाजाबाबत काही ना काही त्रुटी किंवा अडचण असल्याचे स्पष्ट दिसते. प्रकरण नेमके काहीही असो, निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. विरोधकांसह देशातील जनतेकडून उपस्थित केले जाणारे प्रश्न आणि व्यक्त करण्यात येत असलेल्या चिंतांबाबत आयोगाने तातडीने स्पष्टीकरण दिले पाहिजे, असे कुशवाहा यांनी सांगितले. 

तसेच बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाने (RJD) केलेल्या आरोपांवरही त्यांनी भाष्य केले. विधानसभा निवडणुकीत राजदला आपला पराभव होणार याची आधीच पूर्ण जाणीव होती. त्यामुळेच ते सातत्याने निवडणूक आयोगावर खापर फोडण्याचा प्रयत्न करत राहिले. त्यावेळी मतदार याद्यांच्या सखोल तपासणीदरम्यान गैरव्यवहार झाल्यानंतर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण मागवले होते. एवढे आरोप होत असतील, तर अधिकृत तक्रार का दाखल करण्यात आली नाही, असा सवालही आयोगाने केला होता, असेही कुशवाह यांनी माध्यमांना सांगितले.

निवडणूक आयोगातील दुभंगावर केविलवाणा खुलासा
मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाचे सुखबीरसिंग संधू आणि विवेक जोशी या अन्य दोन निवडणूक आयुक्तांनी १० महिन्यांच्या कालावधीत १४ आक्षेप नोंदवल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने २३ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. आपला विरोध डावलून किंवा मत विचारात न घेता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निर्णय घेतल्याची तक्रारच दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे केल्याचे या वृत्तातून समोर आले. तसेच नवमतदारांची नोंदणी करणार्‍या अर्ज क्रमांक सहाचे बदललेले स्वरूप, मतदार यादीतून नावे वगळणे वा नोंदवणे, एसआयआर प्रक्रियेतील काही बाबी तसेच मतदार याद्यांचे नवी दिल्लीत होत असलेले 'केंद्रीकरण' अशा गंभीर मुद्द्यांवर संधू आणि जोशी यांनी प्रतिकूल मतप्रदर्शन केल्याचे नोंदींवरून आढळते. 

यादरम्यान एका निवेदनाद्वारे प्रतिक्रिया देताना निवडणूक आयोगाने त्यातील नोंदी आणि आक्षेप अस्तित्वात असल्याचे मान्य केले. तसेच या नोंदी आपल्या निर्णय प्रक्रियेचा भाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दोन निवडणूक आयुक्तांनी घेतलेल्या आक्षेपांवर मात्र आयोगाने स्वतंत्रपणे प्रतिक्रिया दिली नाही. त्याशिवाय या आक्षेपांवर आयोगाने काही कार्यवाही केली किंवा नाही याबाबतही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. यावरून ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयप्रक्रियेला अन्य दोन केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी लेखी विरोध केल्याची अप्रत्यक्षरित्या कबुली दिल्याचे स्पष्ट होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.