🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्या पत्नीची धक्कादायक पोस्ट; "आपल्या देशात..." म्हणत व्यक्त केली मोठी खंत!

भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्या पत्नीची धक्कादायक पोस्ट; "आपल्या देशात..." म्हणत व्यक्त केली मोठी खंत!

प्रसिद्ध कलाकार आणि भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांच्या पत्नी शिवश्री स्कंदप्रसाद यांनी रेल्वे प्रवासादरम्यान आलेला एक धक्कादायक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रेल्वे डब्यातील सुमारे ४० सहप्रवाशांच्या बेशिस्त वर्तनामुळे आपल्याला अत्यंत मानसिक त्रास सहन करावा लागल्याचा दावा त्यांनी केला आहे. या अनुभवावरून त्यांनी भारतातील सिव्हिक सेन्सवर बोट ठेवले असून, "देवा, या देशाला वाचव!" अशी हताश प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपा खासदाराच्या पत्नीलाच असे म्हणण्याची वेळ आल्यामुळे सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

शिवश्री स्कंदप्रसाद यांनी 'एक्स'वर एक सविस्तर पोस्ट लिहून हा संतापजनक प्रसंग उलगडला. त्यांच्या दाव्यानुसार, ५६ प्रवाशांची क्षमता असलेल्या या डब्यात एकाच समूहातील सुमारे ४० जण प्रवास करत होते. या प्रवाशांनी इतर प्रवाशांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा किंवा शांततेचा जराही विचार न करता सलग पाच तास मोठ्याने आरडाओरड आणि गप्पा मारणे सुरू ठेवले होते.

"आजचा रेल्वे प्रवास माझ्यासाठी अतिशय त्रासदायक ठरला. सार्वजनिक ठिकाणी लोक इतरांच्या स्वातंत्र्याचा पुरेसा आदर राखत नाहीत, हे पाहून अत्यंत वाईट वाटते. सार्वजनिक ठिकाणी इतरांना त्रास होणार नाही याची जाणीव ठेवून मोठ्याने बोलणे टाळायला हवे," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

'भारतात अशा वर्तनावर कोणी जाब विचारू शकत नाही'

आपण एक कलाकार असल्याने शांततेत विचार करणे अधिक पसंत असल्याचे सांगत त्या म्हणाल्या, "एखादा मोठा ग्रुप प्रवास करताना सुरुवातीचा त्यांचा उत्साह समजण्यासारखा असतो. मात्र डब्यातील चाळीसेक प्रौढ लोक सलग पाच तास अविरत गोंधळ घालत असतील तर काय करायचे? भारतात अशा बेशिस्त वर्तनावर कोणी प्रश्न विचारू शकत नाही, हीच खरी मोठी समस्या आहे. त्या ग्रुपचा भाग नसलेल्या डब्यातील उर्वरित १६ प्रवाशांनी हा सर्व गोंधळ मुकाट्याने सहन करावा, असा जणू अलिखित नियमच झाला आहे."

टीटीईकडे दाद मागितली, पण…

सततच्या गोंधळाला कंटाळून शिवश्री यांनी तिकीट तपासनीसाकडे डबा बदलून देण्याची विनंती केली. मात्र संपूर्ण रेल्वे भरलेली असल्याने टीटीई त्यांना केवळ त्याच डब्यात दुसरी जागा देऊ शकले. दरम्यान त्या ग्रुपमधील लोकांचे हसणे-खिदळणे सुरू असतानाच त्यातील आठ प्रवाशांनी 'युनो' हा खेळ खेळण्यास सुरुवात केली. याबाबत त्यांनी पुन्हा टीटीईकडे तक्रार केली. टीटीईच्या सांगण्यावरून संबंधितांनी तो खेळ थांबवला खरा; मात्र काही वेळातच टीटीई तिथे परतले आणि त्यांनी त्या प्रवाशांना गमतीने विचारले, "का सर, का गोंधळ घालत आहात?" त्यावर ते प्रवासी हसून म्हणाले, "सर, तुम्हीपण या, आपण एकत्र खेळूया."

त्यानंतर त्या प्रवाशांनी जाणीवपूर्वक बॉलीवूडची गाणी वाजवण्यास सुरुवात केल्याचा आरोपही शिवश्री स्कंदप्रसाद यांनी केला.

सामाजिक जाणिवेत आपण पराभूत

हा वाद केवळ एखाद्या खेळापुरता नसून सार्वजनिक ठिकाणी पाळायच्या संस्कृतीचा आणि नागरिकांच्या जबाबदारीचा आहे, याकडे लक्ष वेधत शिवश्री म्हणाल्या, "इथे कोण जिंकले किंवा कोण हरले हा प्रश्न नाही. मी आणि ते सर्वजण, एक भारतीय नागरिक म्हणून आपण सामाजिक जाणिवेच्या पातळीवर पराभूत झालो आहोत. एक देश म्हणून आपण सार्वजनिक वर्तनात कधी सुधारणा करणार?" असा सवाल करत त्यांनी आपल्या पोस्टचा शेवट "देवा, या देशाला वाचव!" या शब्दांनी केला.

शिवश्री स्कंदप्रसाद यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटत असून या पोस्टला लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. दरम्यान, या घटनेवर रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.