🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​कृष्णा नदीत निसर्गाचा दुर्मिळ चमत्कार! ८ ते ९ पाणमांजरांचा वावर; सांगलीत पर्यटकांची उत्सुकता ताणली

​कृष्णा नदीत निसर्गाचा दुर्मिळ चमत्कार! ८ ते ९ पाणमांजरांचा वावर; सांगलीत पर्यटकांची उत्सुकता ताणली


सांगली शहरालगतच्या कृष्णा नदीपात्रात प्रथमच दुर्मिळ स्मूथ-कोटेड ऑटर  अर्थात पाणमांजरांचा कळप आढळून आला आहे. नदीपात्रात सुमारे आठ ते नऊ पाणमांजरांचे दर्शन झाल्याने प्राणिमित्रांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, त्यांच्या उपस्थितीची नोंद घेण्यात आली आहे.

कृष्णा नदीपात्रात पाणमांजरांचा कळप आढळून आल्याची ही सांगली शहर परिसरातील पहिलीच नोंद असल्याचे प्राणिमित्रांनी सांगितले. पाणमांजरांचा रंग साधारण राखाडी असून त्यांचे शरीर लांबट, मजबूत आणि पाण्यातील जीवनासाठी अनुकूल असते. हे प्राणी सामान्यतः मानवी वर्दळीपासून दूर नदीपात्रात किंवा जलस्रोतांच्या परिसरात वास्तव्य करतात.

मासे, खेकडे तसेच अन्य जलचर हे पाणमांजरांचे प्रमुख खाद्य आहे. कृष्णा नदीमध्ये या दुर्मिळ जलचरांचा आढळ झाल्याने नदी परिसरातील जैवविविधतेच्या दृष्टीने ही महत्त्वाची नोंद मानली जात आहे. दरम्यान, नदी प्रदूषण, नदीपात्रातील अतिक्रमणे आणि नैसर्गिक अधिवासाचा होणारा ऱ्हास यामुळे पाणमांजरांसह अनेक जलचरांच्या अस्तित्वावर परिणाम होत आहे. त्यामुळे कृष्णा नदीपात्रातील पाणमांजरांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्राणिमित्रांकडून करण्यात आली आहे. त्यांच्या अधिवासाचे संवर्धन झाल्यास या दुर्मिळ प्राण्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.