मिरज :- मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथील स्वागत कमान कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेला तब्बल पाच दिवस उलटून गेले आहेत. महात्मा गांधी पोलीस ठाण्याने या प्रकरणी तातडीने अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला खरा, पण आता "हा अज्ञात नेमका आहे तरी कोण?" असा उद्विग्न प्रश्न संपूर्ण मिरज शहर आणि सांगली जिल्ह्यातील जनता विचारत आहे. ज्या कमान बांधकामाची माहिती, निविदा, कागदपत्रे आणि ठेकेदाराचे नाव सिव्हिल रुग्णालय प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम (PWD) विभागाच्या टेबलावर स्पष्ट पणे उपलब्ध आहे, तरीही 'अज्ञाता'च्या नावाखाली कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे? यात काय मोठे 'गौडबंगाल' आहे, असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे.
पोलीस अधिकाऱ्यांचे शौर्य; पण प्रशासनाची संशयास्पद मौन बाळगण्याची भूमिका
दुर्घटना घडल्या घडल्या महात्मा गांधी चौकीचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्याचे अत्यंत कौतुकास्पद कार्य केले. त्याचप्रमाणे ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांनीही घटनास्थळी तातडीने धाव घेत बचावकार्यात व परिस्थिती हाताळण्यात मोठे योगदान दिले. पोलिसांच्या या तत्परतेबद्दल जनतेतून कौतुक होत असले, तरी दुसरीकडे सिव्हिल प्रशासन आणि PWD खात्याने घेतलेली 'गांधारीची भूमिका' अत्यंत संशयास्पद वाटत आहे.
ठेकेदार कोण, हे माहीत असूनही अज्ञातावर गुन्हा?
सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात काम करणारा ठेकेदार कोण? कमान उभारणीचे किंवा दुरुस्तीचे काम कोणाला दिले होते? हे कागदपत्र पोलिसांना सुपूर्द करणे PWD आणि सिव्हिल प्रशासनाचे प्रथम कर्तव्य होते. परंतु, ५ दिवस होऊनही या विभागांनी ठेकेदाराची अधिकृत माहिती उघड न करता अथवा त्याच्यावर थेट गुन्हा दाखल न करता गप्प राहणे पसंत केले आहे.
जनतेचे प्रशासनाला थेट प्रश्न:
१. रुग्णालयातील कमान कोसळण्यास जबाबदार असलेला ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर थेट नावाने गुन्हा दाखल का झाला नाही?२. सार्वजनिक बांधकाम खाते आणि सिव्हिल प्रशासन या दुर्घटनेचे खापर 'अज्ञाता'वर फोडून कोणाला पायघड्या घालत आहे?३. ५ दिवस उलटूनही कागदपत्रे पोलिसांना का दिली गेली नाहीत? यामध्ये कोणता बडा मासा अडकला आहे?
दोषींवर कारवाई होणार की प्रकरण दाबणार?
या दुर्घटनेत निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात आला, काही जण जखमी झाले. एवढी मोठी घटना घडल्यानंतरही जबाबदार घटकांना अभय दिले जात असल्याचा संताप नागरिकांमध्ये आहे. PWD चे अधिकारी आणि सिव्हिल प्रशासन यांच्यातील साटेलोट्यामुळेच ठेकेदाराचे नाव समोर आणले जात नाहीये का, असा संशय बळावला आहे. या प्रकरणाचा पर्दाफाश होणे अत्यंत गरजेचे असून, महात्मा गांधी पोलीस आणि ग्रामीण पोलीस या 'अज्ञाताचा' मुखवटा गळवून खऱ्या दोषींच्या मुसक्या कधी आवळणार, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
(क्रमश:)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.