🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"१६ पानांच्या FIR मधील १ च पान बाहेर कसे आले?" दिशा सालियन प्रकरणावरून संजय राऊतांचा सवाल

"१६ पानांच्या FIR मधील १ च पान बाहेर कसे आले?" दिशा सालियन प्रकरणावरून संजय राऊतांचा सवाल


अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची माजी मॅनेजर दिशा सालियान हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात सीबीआयने अखेर गुन्हा दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १३ सप्टेंबर रोजी सीबीआयने हा एफआयआर नोंदवला असून, या कारवाईमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आणि मुंबई पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. सीबीआयने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करत प्रत्यक्ष जबाब नोंदवण्यासही सुरुवात केली आहे.

CBI कडून गंभीर कलमे लागू; ३३ हून अधिक नावांची चर्चा
दिशा सालियानचे वडील सतीश सालियन यांचा जबाब ११ सप्टेंबर रोजी सीबीआयने नोंदवून घेतला. त्यानंतर सीबीआयने दाखल केलेल्या १६ पानांच्या एफआयआरमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सचिन वाझे आणि अभिनेता डिनो मोरिया यांच्यासह ३३ पेक्षा जास्त लोकांच्या नावांचा उल्लेख आहे. या सर्वांवर गंभीर आरोप करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तूर्तास कोणालाही थेट आरोपी म्हणून नमूद करण्यात आलेले नाही. तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणालाही आरोपी गृहीत धरू नका, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
हे राजकीय षडयंत्र आणि कारस्थान; संजय राऊत यांचा थेट आरोप

या संपूर्ण प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना सरकारवर जोरदार निशाणा साधला. "हा अत्यंत संवेदनशील विषय असून एका मुलीच्या चारित्र्याशी जोडलेला आहे. तिचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी होता. या प्रकरणाचा तपास यापूर्वीच मुंबई पोलिसांनी पूर्ण केला आहे. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असतानाच पोलिसांनी तपास करून क्लोजर रिपोर्ट दिला होता. त्यात आदित्य ठाकरे यांचा दुरान्वयेही संबंध नाही, हे स्पष्ट झाले होते."

'बीएमसी भ्रष्टाचारावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न'
आदित्य ठाकरे सातत्याने मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. त्यांना रोखण्यासाठीच हे सर्व राजकीय कारस्थान रचले जात आहे. त्यांना थांबवण्याचा हा प्रयत्न आहे, पण तो यशस्वी होणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले. १६ पानांपैकी १ च पान बाहेर कसे आले?

या प्रकरणाला राजकीय आखाडा बनवणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले तरी तपासापूर्वीच संशयास्पद वक्तव्ये केली जात आहेत. १६ पानांच्या एफआयआरमधील केवळ एकच पान बाहेर कसे आले, असा सवाल करत राऊत यांनी याला पूर्णपणे राजकीय षडयंत्र म्हटले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.