🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत LCBचा मोठा दणका! ७ गुन्ह्यांत फरार आरोपी ताब्यात; ६ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

सांगलीत LCBचा मोठा दणका! ७ गुन्ह्यांत फरार आरोपी ताब्यात; ६ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त


सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने  मोठी कारवाई करत तब्बल ७ गुन्ह्यांत पाहिजे व परागंदा असलेल्या रेकॉर्डवरील आरोपीला ताब्यात घेतले आहे. विशाल ऊर्फ मुक्या भिमराव पवार (वय ३५, रा. बहादुरवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ४० ग्रॅम १८४ मिली वजनाच्या दोन सोन्याच्या नक्षीदार बांगड्या, अंदाजे ६ लाख २ हजार ७६० रुपये किमतीच्या, जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशानुसार मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याची मोहीम सुरू आहे. अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी पथक तयार केले होते.

दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार व पथक आष्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस कर्मचारी संकेत कानडे, अभिजीत माळकर, ऋषीकेश सदामते व विनायक सनदी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. विशाल ऊर्फ मुक्या पवार हा चोरीचे सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी आष्टा-नागाव रोडवर थांबला आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ सापळा रचला.
आष्टा-नागाव रोडवरील सह्याद्री मल्टीपर्पज लॉन्ससमोर एक संशयित इसम पोलिसांना दिसला. तो रेकॉर्डवरील आरोपी विशाल पवार असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी त्याला वेढा घालून ताब्यात घेतले. पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात दोन सोन्याच्या बांगड्या आढळून आल्या. 

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपीने या सोन्याच्या बांगड्या मर्दवाडी येथे घरफोडी करून चोरी केलेल्या मालातील आपल्या वाटणीला आलेल्या असल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याने साथीदारांसह घराची कौले काढून घरात प्रवेश करून तिजोरी फोडून चोरी केल्याची कबुली दिल्याचेही पोलिसांनी सांगितले.
जप्त करण्यात आलेल्या सोन्याच्या बांगड्यांपैकी एका बांगडीचे वजन १९ ग्रॅम ९५९ मिली असून तिची किंमत सुमारे २ लाख ९९ हजार ३८५ रुपये, तर दुसऱ्या बांगडीचे वजन २० ग्रॅम २२५ मिली असून तिची किंमत सुमारे ३ लाख ३ हजार ३७५ रुपये आहे. दोन्ही बांगड्यांची एकूण किंमत ६ लाख २ हजार ७६० रुपये आहे.

७ गुन्ह्यांमध्ये आरोपी पाहिजे
तपासात विशाल पवार हा पलूस, आष्टा, कुरळप आणि कुंडल पोलीस ठाण्यांतील सात गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरुद्ध घरफोडी, जबरी चोरी यासह मालमत्तेविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, आरोपीवर यापूर्वी दोन वेळा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत त्याच्याविरुद्ध दरोडा, खून, जबरी चोरी, घरफोडी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.

आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी आष्टा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून, पुढील तपास आष्टा पोलीस ठाणे करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.