सांगली : पवनचक्क्यांमधील कॉपर केबल आणि अॅल्युमिनियमच्या विद्युत तारांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. या कारवाईत लखन केशव शिंदे (वय २५, रा. विठ्ठलनगर, जत) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून एकूण १४ लाख ७४ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जत परिसरातील चोरीचे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशानुसार मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या संशयितांवर कारवाई करून प्रलंबित गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले होते.
पवनचक्क्यांमधील कॉपर आणि अॅल्युमिनियमच्या तारांच्या चोरीचे प्रमाण वाढल्याने या प्रकारच्या चोरी करणाऱ्या संशयितांचा शोध घेण्यात येत होता. याचदरम्यान ६ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार सचिन कनप यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक व्यक्ती टाटा एस कंपनीच्या विनानंबर प्लेटच्या वाहनातून चोरीचे साहित्य विक्रीसाठी घेऊन येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पथकाने झुलेलाल मंदिर ते पुडलॅण्ड हॉटेल परिसरात सापळा रचला. काही वेळाने विनानंबर प्लेटचे टाटा एस वाहन त्या परिसरात येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता वाहनाच्या हौद्यात कॉपर आणि अॅल्युमिनियमच्या वायरचे बंडल आढळून आले.वाहनचालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव लखन केशव शिंदे असल्याचे सांगितले. सुरुवातीला चोरीच्या साहित्याबाबत समाधानकारक माहिती न दिल्याने पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यावेळी लखन शिंदे याने आपण आणि त्याचे साथीदार सोनू शिंदे व समर्थ ऊर्फ गुंडू मोरे, रा. जत यांनी गेल्या वर्षभरापासून जत व परिसरातील पवनचक्क्यांमधून कॉपर आणि अॅल्युमिनियमच्या तारा चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
यानंतर जत पोलीस ठाण्यातील गुन्हे अभिलेख तपासण्यात आले. त्यामध्ये चोरीच्या या प्रकाराशी संबंधित सात गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पंचासमक्ष आरोपीकडील चोरीचे साहित्य आणि गुन्ह्यात वापरलेले टाटा एस वाहन जप्त केले.
जप्त केलेला मुद्देमाल
₹८ लाख ५० हजार किमतीची अॅल्युमिनियम कंडक्टर केबल व विद्युत तार₹१ लाख २३ हजार ५६० किमतीची कॉपर केबल₹८१ हजार ९०० किमतीची सबमर्शीबल केबल₹६८ हजार ८०० किमतीचे कटपॉईंट चॅनेल₹३ लाख ५० हजार किमतीचे टाटा एस मालवाहू वाहनएकूण जप्त मुद्देमाल : ₹१४ लाख ७४ हजार २६०या कारवाईत जत पोलीस ठाण्यातील गु.र.नं. ६२/२०२६, २१२/२०२६, २२५/२०२६, ३७३/२०२६, ४६५/२०२६, ४८१/२०२६ आणि ३६६/२०२६ असे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार आणि त्यांच्या पथकाने केली. कारवाईत सचिन कनप, सोमनाथ पतंगे, श्रीधर बागडी, अमर नरळे, संदीप पाटील, सतीश माने, मच्छींद्र बडे, अनंत कुडाळकर, गुडोपंत दोरकर, संकेत कानडे, विनायक सनदी, अभिजीत माळकर, ऋषीकेश सदामते, केरुबा चव्हाण, चालक सुशांत चिले तसेच सांगली सायबर पोलीस ठाण्याचे पोकों कॅप्टन गुंडवाडे आणि विजय पाटणकर यांनी सहभाग घेतला. आरोपी, जप्त मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन पुढील तपासासाठी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.