पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (१७ सप्टेंबर) ७६ वा वाढदिवस आहे . या खास औचित्यावर पंतप्रधान मोदींचे शालेय जीवनातील शिक्षक एच. सी. पटेल यांनी ‘एनडीटीव्ही’शी बोलताना त्यांच्या बालपणीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर देशाचे पंतप्रधान होण्याआधीपासूनच नरेंद्र मोदी अभ्यासात अतिशय हुशार व चुणचुणीत विद्यार्थी होते, असे पटेल यांनी सांगितले.
वक्तृत्व आणि नाटकात छाप, मिळायची १० मिनिटे सलग दाद
शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, जून १९६५ ते मे १९६७ या काळात वडनगर येथील ‘बी. एन. हायस्कूल’मध्ये १० वी आणि ११ वीत त्यांनी मोदींना गणित व विज्ञान विषय शिकवले होते. शाळेत दर गुरुवारी सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. या कार्यक्रमांमध्ये मोदी स्वामी विवेकानंदांसारख्या महान नेत्यांवर प्रभावी भाषणे द्यायचे.शाळेच्या संरक्षक भिंतीचा निधी उभारण्यासाठी आयोजित एका नाटकात मोदींनी लोकनायक ‘जोगीदास खुमाण’ यांची मुख्य भूमिका साकारली होती. तलवारबाजी आणि काठियावाडी बोलीभाषेतील त्यांचे संवाद कौतुकास्पद ठरले. सुमारे १० हजार प्रेक्षकांनी हे नाटक पाहिले होते आणि मोदींच्या अभिनयाने प्रभावित होऊन उपस्थितांनी सलग १० मिनिटे उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला होता, अशी आठवण पटेल यांनी सांगितली.
शालेय जीवनापासूनच संघ आणि सर्वधर्मादर भाव
मोदींना शाळेतील प्रत्येक उपक्रमात भाग घ्यायला आवडायचे. केवळ स्थानिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शाखेशी कार्यक्रमाची वेळ जुळल्यास ते त्या उपक्रमापासून दूर राहायचे. त्या काळात ते आपल्या २० ते २५ सहकाऱ्यांसह नियमित शाखेत जात असत. याशिवाय, ११ वीत असताना मोदी एका मुस्लिम वर्गमित्राला जेवणासाठी घरी घेऊन यायचे. शालेय वयापासूनच त्यांच्या मनात सर्व धर्मांबद्दल आदराची भावना होती, असेही शिक्षकांनी नमूद केले.
साहसी वृत्ती आणि चहाच्या गाडीवर वडिलांना मदत
नरेंद्र मोदी यांच्या साहसी वृत्तीबद्दल बोलताना शिक्षकांनी सांगितले की, वडनगरचा शर्मिष्ठा तलाव वर्षभर पाण्याने भरलेला असायचा आणि तिथे पोहणे मोदींना खूप आवडायचे. एकदा तर त्यांनी तलावातून मगरीचे छोटे पिल्लू घरी आणले होते; मात्र आई हिराबेन यांनी काळजी व्यक्त केल्यानंतर त्यांनी त्याला पुन्हा तलावात सोडले.त्याचबरोबर, बी. एन. हायस्कूल आणि रेल्वे स्टेशनजवळील वडाच्या झाडाजवळ त्यांच्या वडिलांचे, ‘दामोदरदास मोदी’ यांचे छोटे चहाचे दुकान होते. नरेंद्र वडनगर रेल्वे स्टेशनवर जाऊन प्रवाशांना चहा विकायचा आणि वडिलांना कामात हातभार लावायचा.
मुख्यमंत्री झाल्यावर शिक्षकांचे घेतले आशीर्वाद
२००१ मध्ये मोदी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले, तेव्हाच्या एका प्रसंगाची आठवण सांगताना पटेल भावुक झाले. शपथविधी सोहळ्यादरम्यान पटेल यांनी गर्दीतून "ओ नरेंद्रभाई" अशी हाक मारली. गर्दीमुळे मोदींना आवाज ऐकू आला नाही; मात्र कोणीतरी त्यांना शिक्षकांची माहिती दिली. मोदींनी लगेच मागे फिरून पटेल यांची भेट घेतली आणि त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.
याआधी मुंबईतील एका कार्यक्रमात त्यांनी माजी मुख्याध्यापक रसवैद्य मणियार यांचा जाहीर गौरव केला होता. तसेच २००५ मध्ये मुख्यमंत्री असताना अहमदाबादच्या गुजरात कॉलेजमध्ये त्यांनी बालपणीच्या व हायस्कूलच्या २६ शिक्षकांचा विशेष सत्कार केला होता. शिक्षकांसाठी गाड्या पाठवून त्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते आणि वैयक्तिक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले होते.
देशभरात ‘सेवा दिवस’ म्हणून साजरे
भारतीय जनता पक्षाकडून पंतप्रधान मोदींचा ७६ वा वाढदिवस आणि सार्वजनिक सेवेची २५ वर्षे ‘सेवा दिवस’ म्हणून साजरी केली जात आहेत. याअंतर्गत देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत:बाईक रॅली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुजरातच्या वडनगर ते उत्तर प्रदेशच्या वाराणसीदरम्यान बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवतील.विशेष पूजा व रक्तदान: भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन उज्जैनमध्ये पंतप्रधान मोदींसाठी विशेष पूजा करतील आणि नवी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात रक्तदान शिबिराचे उद्घाटन करतील.स्वच्छता मोहीम: वाढदिवसाच्या उपक्रमांचा भाग म्हणून देशभरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.