रक्षक बनला भक्षक! पोलीस ठाण्यात आलेल्या तरुणीचा पाठलाग करून PSI कडून लैंगिक अत्याचार; राज्यात संतापाची लाट!
बीड जिल्ह्यातील वडवणी शहरातून खाकी वर्दीला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका पोलीस उपनिरीक्षकाने तक्रार द्यायला आलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केला आहे.
आरोपी पीएसआयने 'तुझं काम करून देतो', अशी बतावणी करून तरुणीशी जवळीक वाढवली. यानंतर त्याने पीडितेच्या घरी जाऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला, अशी तक्रार पीडित तरुणीने केली आहे. या प्रकरणी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशानंतर संबंधित पीएसआयवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा अधिक तपास केला जात आहे.
नेमकी घटना काय घडली?
"तुझे काम मार्गी लावून देतो" असे आमिष दाखवून एका पोलीस उपनिरीक्षकानेच (PSI) घरात घुसून २८ वर्षीय पीडित विवाहित महिलेवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले श्रेणी पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासाच्या बहाण्याने घरी जाऊन अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, वडवणी तालुक्यातील एका २८ वर्षीय पीडित महिलेने आपल्या सासरच्या मंडळींविरोधात छळाचा गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्याच्या अनुषंगाने "भेट घ्यायची आहे आणि तुझी केस मी मार्गी लावून देतो" असे सांगत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड शुक्रवारी रात्री पीडित महिलेच्या घरी गेला. तेथे त्याने महिलेशी जबरदस्तीने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. महिलेने या कृत्याला तीव्र विरोध केला असता, तिला धमकी देत राठोड याने तिच्यावर अत्याचार केला.
या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिलेने तातडीने ११२ आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, सुरुवातीला वडवणी पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेण्यासाठी सकारात्मकता दाखवली नाही, असा आरोप पीडितेने केला आहे. अखेर महिला व तिच्या नातेवाईकांनी थेट बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलीस अधीक्षकांच्या कठोर निर्देशानंतर वडवणी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी गणेश राठोड याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सेवानिवृत्तीला ३ वर्षे बाकी असताना तरुणीवर अत्याचार
संशयित आरोपी गणेश राठोड हा याची असिस्टंट सब-इन्स्पेक्टर (ASI) वरून ग्रेड पीएसआय (PSI) म्हणून पदोन्नती झाली होती. त्याच्या शासकीय सेवेच्या निवृत्तीला केवळ ३ वर्षे बाकी आहेत. आपल्याच मुलीच्या वयाच्या महिला तक्रारदारावर अत्याचार केल्यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. ज्या पोलीस ठाण्यात त्याने उपनिरीक्षक म्हणून काम केले, त्याच ठाण्यात त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होण्याची नामुष्की ओढवली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.