शून्य बॅलन्स तरी करता येणार UPI पेमेंट, मिळणार बिनव्याजी कर्ज; मित्र-नातेवाईकांना पैसे ट्रान्सफर करता येणार का? A to Z नियम अन् अटी जाणून घ्या
मुंबई : तुम्ही एखाद्या दुकानात उभे आहात आणि पेमेंट करण्यासाठी UPI QR कोड स्कॅन केला. मात्र तुमच्या बँक खात्यात पैसेच नाहीत शिवाय घरातून पाकीटही आणलेले नाही. अशा वेळी पेमेंट करण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते.
मात्र भविष्यात अशी परिस्थिती आली तरी तुमच्याकडे पेमेंट करण्याचा पर्याय असू शकतो. भारतीय राष्ट्रीय पेमेंट महामंडळ (NPCI) UPIवर क्रेडिट लिमिटची सुविधा आणत आहे. या नव्या फ्रेमवर्कअंतर्गत बँका त्यांच्या पात्र ग्राहकांना आधीच मंजूर केलेली म्हणजेच प्री-सॅंक्शन क्रेडिट लाइन (Pre-sanctioned Credit Line) उपलब्ध करून देऊ शकतील.
NPCIने 18 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या पत्रकात सर्व सदस्य बँका तसेच PhonePe, Google Pay आणि Paytm यांसारख्या UPI अॅप्सना अकाउंट स्ट्रक्चर प्रमाणित करण्याचे निर्देश दिले आहेत. याचा उद्देश सर्व UPI युझर्सना एकसारखा आणि सहज अनुभव मिळवून देणे हा आहे. हे संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी बँका आणि अॅप्सना 15 डिसेंबर 2026 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
प्री-सॅंक्शन क्रेडिट लाइन म्हणजे काय?
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर प्री-सॅंक्शन क्रेडिट लाइन ही बँकेकडून दिली जाणारी डिजिटल ओव्हरड्राफ्ट किंवा आधीच मंजूर केलेल्या कर्जासारखी सुविधा आहे. आतापर्यंत UPIद्वारे पेमेंट करण्यासाठी संबंधित बँक खात्यात पुरेशी स्वतःची रक्कम असणे आवश्यक होते. मात्र नव्या फ्रेमवर्कनुसार बँका पात्र ग्राहकांना आधीच मंजूर केलेली क्रेडिट लाइन देऊ शकतील.
उदाहरणार्थ: एखाद्या बँकेने तुम्हाला 50,000 रुपयांची क्रेडिट लिमिट मंजूर केली असेल तर UPI पेमेंट करण्यापूर्वी ही रक्कम बचत खात्यात ट्रान्सफर करण्याची गरज राहणार नाही. UPIद्वारे पेमेंट करताना बँक खात्यासोबत क्रेडिट लाइन निवडण्याचा पर्याय मिळू शकतो. त्यानंतर तुम्ही क्रेडिट लाइनमधून जितकी रक्कम खर्च कराल, ती संबंधित नियम आणि ठरवलेल्या मुदतीनुसार परतफेड करावी लागेल.
UPI क्रेडिट लाइनचे दोन प्रकार
UPIवर उपलब्ध होणारी क्रेडिट सुविधा दोन प्रकारची असेल. पहिली बिनव्याजी क्रेडिट लाइन (CLIF) असेल. ही सुविधा मोठ्या प्रमाणात क्रेडिट कार्डच्या बिलिंग सायकलप्रमाणे काम करेल. ग्राहकाला ठरावीक ग्रेस पीरियड दिला जाईल. या कालावधीत किंवा ठरलेल्या अंतिम तारखेपर्यंत संपूर्ण थकबाकी भरल्यास अतिरिक्त व्याज आकारले जाणार नाही.
दुसरी सुविधा व्याज आकारली जाणारी क्रेडिट लाइन (CLIB) असेल. ही सुविधा वैयक्तिक कर्जाप्रमाणे काम करू शकते. या प्रकारच्या क्रेडिट लाइनमध्ये व्यवहार झाल्याच्या तारखेपासून व्याज लागू होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक UPI क्रेडिट लाइन बिनव्याजी असेल, असे समजणे योग्य ठरणार नाही. व्याजदर किती असेल, हे संबंधित बँक निश्चित करेल.
ही सुविधा कोणाला मिळणार?
UPIवरील क्रेडिट लाइन प्रत्येक ग्राहकाला आपोआप उपलब्ध होणार नाही. बँका ग्राहकाची आर्थिक पार्श्वभूमी आणि व्यवहारांचा इतिहास तपासून ही सुविधा कोणाला द्यायची, हे ठरवतील. यामध्ये ग्राहकाचा आर्थिक इतिहास, बँकेतील व्यवहारांचे रेकॉर्ड, उत्पन्न आणि क्रेडिट स्कोअर यांसारख्या बाबींचा विचार केला जाऊ शकतो. त्यानुसार संबंधित ग्राहकाला किती क्रेडिट लिमिट द्यायची, हेही बँक ठरवेल.
UPI क्रेडिट लाइनचे काय फायदे होऊ शकतात?
महिन्याच्या अखेरीस पगार संपलेला असताना अचानक वैद्यकीय खर्च किंवा घरगुती खर्च उद्भवल्यास ही सुविधा उपयोगी ठरू शकते. अशा वेळी तातडीच्या खर्चासाठी इतरांकडून पैसे मागण्याची गरज कमी होऊ शकते. याशिवाय क्रेडिट कार्ड नेहमी सोबत बाळगण्याची गरज राहणार नाही. मोबाइलवरील UPI अॅपच्या माध्यमातून मंजूर क्रेडिट लिमिटचा वापर करून पेमेंट करता येऊ शकते. तसेच बँकेने दिलेल्या संपूर्ण क्रेडिट लिमिटवर देयक तयार होणार नाही. उदाहरणार्थ: 50,000 रुपयांची लिमिट मंजूर झाली आणि त्यापैकी केवळ 5,000 रुपये खर्च केले तर देयकाची रक्कम वापरलेल्या रकमेपुरतीच असेल.
UPI क्रेडिट लाइन कुठे वापरता येणार?
NPCIच्या फ्रेमवर्कनुसार UPI क्रेडिट लाइनचा वापर अनेक प्रकारच्या व्यवहारांसाठी करता येईल. दुकानांमधील किंवा ऑनलाइन मर्चंट पेमेंटसाठी याचा वापर करता येईल. त्याचबरोबर EMI, UPI AutoPay आणि UPI Reserve Pay यांसारख्या सुविधांसाठीही क्रेडिट लाइन वापरण्याची परवानगी असेल. व्याज आकारल्या जाणाऱ्या क्रेडिट लाइनच्या बाबतीत काही ठरावीक अटींसह पर्सन-टू-पर्सन (P2P) ट्रान्सफरची सुविधाही उपलब्ध होऊ शकते.
कुठे वापरता येणार नाही?
बिनव्याजी क्रेडिट लाइनचा वापर मित्र किंवा नातेवाईकांच्या वैयक्तिक बँक खात्यावर म्हणजेच P2P व्यवहारासाठी पैसे पाठवण्यासाठी करता येणार नाही. याशिवाय UPI Lite, UPI Circle आणि आंतरराष्ट्रीय पेमेंट्ससाठी UPI क्रेडिट लाइनचा वापर करता येणार नाही. मात्र रुपे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणारे आंतरराष्ट्रीय UPI पेमेंट यापुढेही सुरू राहणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.