पासपोर्टचे नूतनीकरण करणे आता चांगलेच महाग झाले आहे. एका पासपोर्टचे नूतनीकरण करायचे असल्यास पासपोर्टधारकाला तब्बल 12 हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
केंद्र सरकारच्या पासपोर्ट जारी करणे आणि नूतनीकरणाच्या शुल्कवाढीला दिल्ली हायकोर्टाने हिरवा कंदील दिला आहे. शुल्कवाढीच्या विरोधात करण्यात आलेली याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. मागील 14 वर्षांत 67 टक्के फी वाढ ही चुकीची नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.
मुख्य न्यायाधीश नितीन वासुदेव साम्ब्रे आणि न्यायाधीश संजय शर्मा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. पासपोर्ट शुल्क ठरवणे हा सरकारच्या कामाचा भाग आहे. जोपर्यंत शुल्क खूप जास्त वाटत नाही तोपर्यंत यात न्यायालयाला यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता वाटत नाही. प्रवासी लीगल सेलकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर कोर्टात सुनावणी पार पडली. याचिकाकर्त्याकडून वकील नेया ए. एस यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, विदेशात राहणाऱया काही भारतीयांसाठी पासपोर्टच्या नूतनीकरणाचे शुल्क वाढून 12 हजार रुपये झाले आहे.
भारतात राहणाऱया पासपोर्टधारकांच्या तुलनेत देशाबाहेर राहणाऱया पासपोर्टधारकांचे शुल्क जवळपास पाच हजार रुपये अधिक आहे. यात पासपोर्ट (संशोधन) नियम 2026 अंतर्गत लागू करण्यात आलेल्या पासपोर्ट शुल्कच्या नव्या संरचनेला आव्हान देण्यात आले होते, परंतु कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता पासपोर्टच्या नूतनीकरणासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
फी वाढ योग्यच
केंद्र सरकारकडून याआधी पासपोर्ट शुल्कामध्ये 2012 मध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल 14 वर्षांनंतर ही दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयाला यात हस्तक्षेप करण्याची गरज वाटत नाही, असे न्यायालयाने नमूद करत मागील 14 वर्षांत 67 टक्के फी वाढ ही चुकीची नाही, असे न्यायालयाने याचिका फेटाळताना नमूद केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.