बाजारपेठेत दिवाळी शॉपिंगची मोठी गर्दी असून याचाच फायदा सायबर भामटे घेत आहेत. दुकानांमधील अस्सल QR कोडवर चोरून स्वतःचे बनावट स्टिकर्स चिकटवून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. एक छोटीशी चूक तुम्हाला हजारो रुपयांचा फटका देऊ शकते, म्हणूनच पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी दुकानदाराचे नाव तपासणे आवश्यक आहे.
दिवाळीच्या सणासुदीत बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहेत. कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मिठाई आणि फटाक्यांच्या दुकानांवर खरेदीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, याच उत्साहाचा आणि गर्दीचा गैरफायदा घेण्यासाठी सायबर गुन्हेगारही प्रचंड सक्रिय झाले आहेत. सध्या गुगल पे आणि फोन पे युजर्सना टार्गेट करत "QR कोड स्कॅम" चे जाळे वेगाने पसरत आहे.
रिझर्व्ह बँक आणि NPCI चा इशारा
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) डिजिटल सुरक्षेबाबत विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक रिपोर्टनुसार, सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंट फ्रॉडमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली आहे.
"UPI नियमांनुसार, कोणाकडूनही पैसे मिळवण्यासाठी (Receive करण्यासाठी) कधीही QR कोड स्कॅन करावा लागत नाही किंवा UPI PIN टाकावा लागत नाही," असा स्पष्ट इशारा NPCI च्या अधिकृत फ्रॉड-अवेअरनेस पेजवरदेण्यात आला आहे.
कसा होतोय स्कॅम?
फेक दिवाळी बोनस आणि कॅशबॅक ऑफर्स
स्कॅमर्स ग्राहकांना व्हॉट्सॲप किंवा मेसेजवर गुगल पे किंवा फोन पे च्या हुबेहूब दिसणाऱ्या लिंक्स आणि QR कोड पाठवतात. "दिवाळी बंपर धमाका ऑफरअंतर्गत 15,000 रुपयांचे बक्षीस मिळवण्यासाठी हा कोड स्कॅन करा," असे आमिष दाखवले जाते. ग्राहक पैसे मिळतील या आशेने कोड स्कॅन करून जसा UPI पिन टाकतात, तशी खात्यातील रक्कम चोरट्यांच्या खात्यात जमा होते.
दुकानांमधील QR कोडची छेडछाड
दिवाळीच्या गर्दीचा फायदा घेऊन भामटे लहान दुकानांमधील किंवा हातगाड्यांवरील ओरिजिनल QR कोड स्टिकरवर स्वतःचा बनावट QR कोड चोरून चिकटवून देतात. ग्राहक दुकानदाराला पैसे पाठवण्यासाठी तो कोड स्कॅन करतो, पण पेमेंट थेट स्कॅमरच्या खात्यात जाते.
बचावासाठी काय करावे?
नाव तपासा: CERT-In च्या सूचनेनुसार, दुकानात किंवा कुठेही QR कोड स्कॅन केल्यानंतर मोबाईल स्क्रीनवर येणारे नाव आणि प्रत्यक्ष दुकानदाराचे नाव तंतोतंत जुळते का, याची खात्री करा.पिन सुरक्षित ठेवा: UPI पिन हा तुमच्या एटीएम पिनसारखाच अत्यंत गोपनीय असतो. पैसे खात्यातून वजा होणार असतील तरच पिन टाकावा लागतो, पैसे येण्यासाठी नाही.स्क्रीन शेअरिंग टाळा: पेमेंट फेल झाल्यास अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून फोनमध्ये कोणतेही ॲप डाऊनलोड करू नका किंवा स्क्रीन शेअर करू नका.
फसवणूक झाल्यास काय करावे?
सणासुदीच्या काळात तुमची डिजिटल फसवणूक झाली, तर 'गोल्डन अवर' म्हणजे पहिल्या एका तासाच्या आत गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 वर कॉल करा. तात्काळ National Cyber Crime Reporting Portal वर तक्रार नोंदवून आपल्या बँकेला खाते तात्पुरते ब्लॉक करण्याची विनंती करा, जेणेकरून पुढील होणारे नुकसान टाळता येईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.