नवी दिल्ली : जमीन, घर, दुकान अशा विविध प्रकारच्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करणारे अनेक जण तुम्ही पाहिले असतील. मात्र एका महिलेने अशा गोष्टीत पैसे गुंतवले, ज्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे.
या महिलेने तब्बल 20 लाख डॉलर म्हणजेच सुमारे 19.36 कोटी रुपये खर्च करून 196 पार्किंग स्पेस खरेदी केल्या. ऐकायला ही गुंतवणूक विचित्र वाटत असली तरी ती फायदेशीर ठरल्याचे दिसत आहे. आज या महिलेला दर महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
चीनच्या हुनान प्रांतातील या महिलेने आता आपल्या पार्किंग स्पेस भाड्याने देण्यास सुरुवात केली आहे. यापैकी काही पार्किंग स्पेस खरेदी किमतीपेक्षा दुपटीहून अधिक किमतीत विकण्याचाही व्यवहार तिने केला आहे. सुरुवातीला महिलेने पार्किंगमध्ये पैसे गुंतवल्यानंतर अनेकांनी हा तोट्याचा सौदा असल्याचे म्हटले होते.
मात्र आता हीच गुंतवणूक तिच्यासाठी मोठ्या नफ्याचा स्रोत ठरली आहे. हुनान टीव्हीच्या वृत्तानुसार हा प्रकल्प 2018 मध्ये पूर्ण झाला होता. त्या वेळी बहुतांश लोकांना या प्रकल्पात गुंतवणूक करण्यात रस नव्हता. लोकांचा कल फ्लॅट आणि इतर मालमत्ता खरेदी करण्याकडे होता. मात्र, या महिलेने भविष्यात पार्किंगची गरज वाढणार असल्याचा अंदाज घेत त्यात पैसे गुंतवले.
संपूर्ण प्रकल्पातील 40 टक्के हिस्सा खरेदी केला
या महिलेने 196 पार्किंग स्पेस खरेदी करण्याबरोबरच संपूर्ण प्रकल्पातील 40 टक्के हिस्साही स्वतःच्या नावावर केला. यासाठी तिने एकरकमी 1.4 कोटी युआन म्हणजेच सुमारे 20 कोटी रुपये दिले. हा प्रकल्प उभारणाऱ्या विकासकाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे त्याने महिलेबरोबर हा व्यवहार निश्चित केला.महिलेने पार्किंग स्पेस खरेदी केल्या, तेव्हा हा परिसर पूर्णपणे विकसित झालेला नव्हता. मात्र त्यानंतर लवकरच येथे मॉल, शाळा, रुग्णालये आणि इतर आवश्यक सुविधा विकसित झाल्या. या विकासाचा फायदा महिलेच्या गुंतवणुकीला झाला. आज या परिसरात पार्किंगची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
दर महिन्याला किती कमाई होते?
परिसरातील पार्किंगची मागणी वाढल्यानंतर महिलेने आपल्या पार्किंग स्पेस भाड्याने देण्यास सुरुवात केली. 2018 मध्ये ज्या दराने पार्किंग भाड्याने मिळत होती त्यापेक्षा आता दुप्पट भाडे आकारले जात आहे. महिलेला एका पार्किंग स्पेसमधून महिन्याला 7,258 रुपये भाडे मिळते. या दराने 196 पार्किंग स्पेसचे एकूण मासिक भाडे मोजल्यास सुमारे 14 लाख रुपये होते. म्हणजेच या महिलेची दर महिन्याची कमाई जवळपास 14 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. परिसरातील काही रहिवाशांनी महिलेला पार्किंगचे भाडे कमी करून 4,334 रुपये करण्याची विनंती केली होती. मात्र महिलेने ही मागणी स्पष्टपणे फेटाळून लावली.
पार्किंगच्या किमतीत 80 टक्क्यांहून अधिक वाढ
या महिलेला पार्किंगमधून केवळ भाड्याचे उत्पन्न मिळत नाही तर पार्किंग स्पेस विकूनही नफा कमावण्याची संधी मिळत आहे. सध्या एका पार्किंग स्पेसची किंमत 15 हजार डॉलर म्हणजेच सुमारे 14.52 लाख रुपये झाली आहे. ही किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा 80 टक्क्यांहून अधिक असल्याचे वृत्तात म्हटले आहे.महिलेच्या या गुंतवणुकीला विरोध करणाऱ्या काही स्थानिक रहिवाशांनी हा व्यवहार रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावत महिलेच्या बाजूने निर्णय दिला. न्यायालयाने स्पष्ट केले की, या प्रकल्पातील पार्किंग स्पेस खरेदी करण्याची संधी सर्वांना उपलब्ध होती. मात्र त्यावेळी या गुंतवणुकीतील जोखीम स्वीकारण्याचे धाडस केवळ या महिलेने दाखवले. त्यामुळे आता तिला या गुंतवणुकीतून नफा कमावण्यापासून रोखता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.