दिल्लीतील 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनादरम्यान आंदोलकांना ताब्यात घेतल्याच्या प्रकरणावर संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार कार्यालयाने चिंता व्यक्त केली आहे. भारतीय अधिकाऱ्यांना शांततापूर्ण एकत्र येण्याच्या अधिकाराचा आदर करण्याचे आणि मनमानीपणे ताब्यात घेतलेल्यांना तात्काळ सोडण्याचे आवाहन केले आहे.
जंतर मंतरच्या दिशेने मोर्चा काढणाऱ्या हजारो आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, परंतु नंतर अनेकांना सोडून देण्यात आले. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाचे प्रवक्ते थमिम अल-खैथान म्हणाले की, दिल्लीतील आजच्या मोठ्या निदर्शनांपूर्वी आणि दरम्यान आंदोलक, चळवळीचे नेते, नागरी समाजाचे सदस्य, वकीलांना मोठ्या प्रमाणावर ताब्यात घेतल्याच्या वृत्तांमुळे ते चिंतित आहेत. आम्ही अधिकाऱ्यांना शांततापूर्ण एकत्र येण्याच्या अधिकाराचा पूर्णपणे आदर करण्याचे आणि तो सुनिश्चित करण्याचे आवाहन करतो," असे निवेदनात म्हटले आहे.
कोणत्याही अटींशिवाय सुटका झालीच पाहिजे: संयुक्त राष्ट्र
अल-खैथान यांनी भारतीय अधिकाऱ्यांना आवाहन केले की, शांततापूर्ण आंदोलकांशी वागताना कायदा अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत संयम बाळगावा. हे देशाच्या लोकशाही परंपरा आणि मानवाधिकारांप्रति असलेल्या वचनबद्धतेशी सुसंगत असले पाहिजे. ज्यांना मनमानीपणे ताब्यात घेण्यात आले आहे, त्या सर्वांची तात्काळ आणि कोणत्याही अटींशिवाय सुटका झाली पाहिजे."
सीजेपीने दिल्लीतील एक प्रमुख स्थळ असलेल्या जंतर मंतर येथे आंदोलन करण्याची योजना आखली होती, परंतु पोलिसांनी परवानगी नाकारली. कडक सुरक्षा व्यवस्था आणि रस्त्यावरील अडथळ्यांमुळे बहुतेक आंदोलकांना त्या परिसरात पोहोचता आले नाही. सीजेपीने कळवले आहे की, त्यांचे संस्थापक अभिजीत दीपके आणि त्यांचे सहकारी सौरभ दास व आशुतोष रांका यांना मुंबईहून दिल्लीला येणाऱ्या विमानातून उतरताच ताब्यात घेण्यात आले. दिल्ली पोलिसांनी त्यांच्या अटकेवर कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही.
सीजेपी 11 ऑक्टोबरला पुन्हा आंदोलन करणार
'कॉकरोच जनता पार्टी'ने म्हटले आहे की, जोपर्यंत ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. सीजेपीने रविवारी 11 ऑक्टोबर सकाळी 10 वाजता जंतर मंतरवर आणखी एका आंदोलनाची घोषणा केली आहे. दरम्यान, दिल्ली वाहतूक पोलिसांनी नवी दिल्ली आणि मध्य दिल्लीत संभाव्य निर्बंधांबाबत इशारा दिला आहे. सीजेपीचे राष्ट्रीय संघटन प्रभारी अजिंक्य शिंदे म्हणाले, आज ताब्यात घेतल्यानंतर आम्ही घरी परत जाऊ, असा विचार सरकारने केला असेल. मोदी आणि शाह यांची ही भीती दाखवते की आम्ही अर्धी लढाई जिंकली आहे. तुम्ही पाहिजे तितक्या लोकांना ताब्यात घ्या, पण जोपर्यंत ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. आम्ही उद्या सकाळी 10 वाजता पुन्हा जंतर मंतरवर जाऊ. त्यांनी लोकांना मोठ्या संख्येने आंदोलनात सामील होण्याचे आणि पोलिसांनी अडवले तरी आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.