🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरज सिव्हिल कमान दुर्घटना: ११ दिवस उलटले तरी तपास थंड बस्त्यात; संशयित ठेकेदाराला अभय का? संघटना आक्रमक, तीव्र आंदोलनाचा इशारा!

मिरज सिव्हिल कमान दुर्घटना: ११ दिवस उलटले तरी तपास थंड बस्त्यात; संशयित ठेकेदाराला अभय का? संघटना आक्रमक, तीव्र आंदोलनाचा इशारा!


​मिरज :- सिव्हिल हॉस्पिटलसमोरील प्रवेशद्वाराची कमान कोसळून झालेल्या भीषण अपघाताला तब्बल ११ दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, एवढी मोठी दुर्घटना घडूनही मिरज पोलिसांचा तपास अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. निष्पापांचा जीव धोक्यात घालणाऱ्या दोषी ठेकेदारावर थेट गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलीस प्रशासन आणि संबंधित विभाग नेमकी कोणाची गय करत आहेत? असा संतप्त सवाल आता मिरजकर विचारत आहेत.

​'अज्ञात'चा बुरखा ओढून ठेकेदाराला वाचवण्याचा प्रयत्न?
दुर्घटना घडल्यानंतर तत्परता दाखवत पोलिसांनी स्वतः फिर्यादी बनून 'अज्ञात' व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला खरा, पण आता ११ दिवस उलटूनही त्या 'अज्ञात'चा चेहरा पोलिसांना शोधता आलेला नाही, हे दुर्दैव! प्रत्यक्ष काम करणाऱ्या ठेकेदाराचा निष्काळजीपणा आणि निकृष्ट दर्जाचे काम यांमुळेच ही कमान कोसळल्याचे उघडकीस आले आहे. तरीही ठेकेदारावर थेट नामनिर्देशित गुन्हा दाखल न करता त्याला प्रशासनाकडून पाठीशी का घातले जात आहे? असा थेट संशय आता व्यक्त केला जात आहे.
​चौकशी समितीचा 'मुदतवाढ'चा खेळ!

दुसरीकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाने या दुर्घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती स्थापन केली होती. या समितीने सत्य शोधून तात्काळ अहवाल देणे अपेक्षित असताना, उलट अहवाल सादर करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. चौकशी समितीचा हा मुदतवाढ खेळ म्हणजे वेळकाढूपणा करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न तर नाही ना? असा घणाघाती आरोप विविध सामाजिक संघटनांनी केला आहे.

​ठेकेदारावर गुन्हा दाखल न झाल्यास 'जबाब दो' आंदोलन!
प्रशासनाच्या या संशयास्पद आणि मवाळ भूमिकेमुळे मिरजेतील नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांमधून संतापाचा उद्रेक होत आहे. "केवळ कागदी घोडे नाचवणे थांबवा आणि अपघाताला जबाबदार असणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला गजाआड करा," अशी आक्रमक मागणी संघटनांनी केली आहे. येत्या २४ तासांत ठेकेदारावर थेट गुन्हा दाखल न झाल्यास पोलीस ठाणे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर तीव्र आणि आक्रमक आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. आता पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग दोषी ठेकेदारावर कडक कारवाई करणार की आंदोलनाच्या आगीत तेल ओतणार, याकडे संपूर्ण मिरज शहराचे लक्ष लागले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.